
सातारा- प्रतिनिधी
सातारा जिल्हयातील मतदार बंधु-माता भगिनींनी भरभरुन आशिर्वाद दिले आहेत. आता सातारा जिल्हयाच्या विकासाकरीता जास्तीत जास्त श्रमकार्य करण्याची जबाबदारी सरकार म्हणून आपली आहे. त्यामुळे आपल्या अखत्यारितील पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या माध्यमातुन कृष्णा नदी प्रदुषण मुक्त आणि जलपर्णी मुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात अशी सूचना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय मंत्री ना.भुपेंद्र यादव यांना केली,
सातारा– विधानसभा निवडणुक प्रभारी म्हणून ना.भुपेंद्र यादव यांनी केलेल्या अनुभवी मार्गदर्शनामुळेच जिल्हयातील महायुतीचे सर्व उमेदवार निवडुन आले, त्याबद्दल जिल्हयाच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो अशी भावना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ना.भुपेंद्र यादव यांचेकडे व्यक्त केली.
आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री श्री.भुपेंद्र यादव यांची निवासस्थानी सदिच्छा भेट दिली त्यावेळी झालेल्या चर्चेत भाग घेताना, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सर्वप्रथम सांगीतले की, महाराष्ट्रामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मा. मंत्री महोदय हे निवडणुकीसाठी प्रभारी होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीने व महायुतीने राज्यात व जिल्ह्यात दैदिप्यमान विजय संपादन केला त्याबद्दल ना. भुपेंद्र यादव यांचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देवून जिल्हावासियांच्या वतीने अभिनंदन केले.
यावेळी चर्चा करतान खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ठळकपणे नमुद केले की, कृष्णा नदीच्या पात्रात होणाऱ्या प्रदुषणाच्या बाबतीत सद्याची स्थिती चिंताजनक आहे.
वाई, कराड, सातारा या मोठ्या शहरातील काही संस्था व सुजाण नागरिक यावर काम करत असून त्यास केंद्र शासनाच्या माध्यमातून (वेस्ट अरेस्टरस्) सारख्या नविन तंत्रज्ञानाचा जोड दिल्यास, नदीपात्रातील प्लास्टिक कचरा निर्मुलन करण्यात यश येईल. यासाठी ज्या सामाजिक संस्था यामध्ये देशभरात चांगले कार्य करीत असतील त्यांना सामाजिक दायित्व निधी मधुन सातारा जिल्ह्यात कार्य करण्यास प्रोत्साहित करावे, संबंधीत संस्थांना स्वच्छता अभियान, जन जागृती चळवळ उभी करण्यासाठी केंद्राने पाउले उचलावित, त्यासाठी स्थानिक पातळीवर लागेल ते सहकार्य आमच्या कडून होईल, नदी प्रदुषण रोखणे ही सामाजिक जबाबदारी सर्वांची आहे. या जबाबदारीच्या भावनेतुन कृष्णा नदीच्या प्रदुषणावर सविस्तर अभ्यास करण्यात यावा, वाई, कराड, सातारा या नगरपालिकांना प्रदुषण रोखण्यासाठी अधिकचा निधी देणेत यावा. जलपर्णी मुक्त कृष्णा नदी राहण्यासाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे असे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले.