
सातारा प्रतिनिधी न्यूज नेटवर्क
मीरा रोडमध्ये एका व्यापाऱ्यावर मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीवरून राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठी न बोलल्याने व्यापाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांवर झाला असून, यावरून आता भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी वादग्रस्त वक्तव्य करत ठाकरे बंधूंवर थेट निशाणा साधला आहे.
एक्सवर पोस्ट करत निशिकांत दुबे यांनी, “हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा,” असं म्हणत एकप्रकारे मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाला डिवचलं आहे.
हिंदी भाषी लोगों को मुम्बई में मारने वाले यदि हिम्मत है तो महाराष्ट्र में उर्दू भाषियों को मार कर दिखाओ । अपने घर में तो कुत्ता भी शेर होता है? कौन कुत्ता कौन शेर खुद ही फ़ैसला कर लो
— Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) July 6, 2025
भाषा वादावरून पेटला राजकीय संघर्ष
मीरा रोड परिसरात एका व्यावसायिकावर केवळ तो मराठीत न बोलल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी मनसेच्या सात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही थेट मनसेला इशारा दिला होता. “भाषेवरून मारहाण करणं चुकीचं आहे. आपण मराठी आहोत, त्याचा अभिमानही आहे, पण इतर भाषिकांवर अन्याय केला जाणार नाही,” असं स्पष्ट शब्दांत त्यांनी म्हटलं होतं.
फडणवीस यांचा मनसेला इशारा
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले होते की, “उद्या आपल्या मराठी बांधवांना इतर राज्यांत अशीच वागणूक मिळाली तर चालेल का? कायदा हातात घेतला, तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा देत त्यांनी कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आणला.
नवा वाद उफाळण्याची चिन्हं
खासदार दुबे यांच्या ‘कुत्रा-वाघ’ या वाक्यप्रचारामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेना (ठाकरे) व मनसे यांच्याकडून यावर काय प्रतिक्रिया येणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दुबे यांच्या पोस्टला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना थेट टॅग करण्यात आलं असून, हिंदी भाषिकांवरील कथित अन्यायाचा मुद्दा पुन्हा उचलून धरला गेला आहे.
मनसेची भूमिका ठाम
दरम्यान, मनसेने वारंवार स्पष्ट केलं आहे की मुंबई ही मराठी माणसांची आहे आणि इथे मराठीला प्राधान्य दिलं जायलाच हवं. मात्र या भूमिकेमुळे परप्रांतीयांविरोधात कायदेशीर चौकशी होण्याची वेळ वारंवार आली आहे.
राज्याच्या राजकारणात भाषेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. भाजप खासदाराच्या वक्तव्यामुळे आता हे प्रकरण आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत. पोलिसांनी गुन्हे दाखल केले असले, तरी राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण अधिकच तापले आहे.