
अकोला प्रतिनिधी
रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार, १० जुलैपासून सर्व प्रवासी गाड्यांचा प्रथम आरक्षण चार्ट गाडीच्या प्रस्थानाच्या आठ तास आधीच तयार करण्यात येणार आहे. सध्या ही प्रक्रिया फक्त चार तास आधी होत होती. त्यामुळे प्रवाशांना तिकीटाची स्थिती (कन्फर्म/वेटिंग/रद्द) शेवटच्या क्षणापर्यंत कळत नव्हती. आता ही अनिश्चितता दूर होणार आहे.
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार,
५:०० ते १४:०० दरम्यान प्रस्थान करणाऱ्या गाड्यांचा आरक्षण चार्ट मागील दिवशी रात्री ९:०० वाजेपर्यंत तयार होईल.
१४:०० नंतरपासून ते मध्यरात्रीपर्यंत आणि पहाटे ५:०० पर्यंत प्रस्थान होणाऱ्या गाड्यांचे चार्ट त्यांच्या प्रस्थानाच्या आठ तास आधी तयार केले जातील.
दुसऱ्या आरक्षण चार्टच्या विद्यमान व्यवस्थेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
या निर्णयामुळे प्रवाशांना त्यांच्या तिकिटाविषयीची स्पष्टता लवकर मिळेल. फक्त कन्फर्म तिकिटधारकच फलाटावर पोहोचतील, परिणामी स्थानकांवरील अनावश्यक गर्दी टळेल आणि स्वच्छता व्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होईल. रेल्वे प्रशासनाने हा निर्णय पारदर्शकता व प्रवाशांच्या हितासाठी घेतल्याचं स्पष्ट केलं आहे.
विशेष ट्रेनची घोषणा: तिरुपती–हिसार साप्ताहिक गाडी धावणार, २४ फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर
प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून रेल्वेने तिरुपती–हिसार दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी (क्र. ०७७१७/०८८१८) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
९ जुलै ते २४ सप्टेंबर दरम्यान ही गाडी तिरुपती येथून प्रत्येक बुधवार रात्री २३:४५ वाजता सुटेल, आणि शनिवारी दुपारी १४:०५ वाजता हिसार येथे पोहोचेल.
याउलट, १३ जुलै ते २८ सप्टेंबर दरम्यान हिसार येथून ही गाडी प्रत्येक रविवारी रात्री २३:१५ वाजता सुटेल, आणि बुधवारी सकाळी ११:३० वाजता तिरुपतीला पोहोचेल.
या गाडीला दक्षिण भारतापासून राजस्थानपर्यंत ४० हून अधिक प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. अकोला, जळगाव, नांदेड, वडोदरा, अजमेर, सीकर, झुंझुनू, चित्तौडगड, रतलाम अशा प्रमुख शहरांचा यात समावेश आहे.
गाडीमध्ये २० तृतीय श्रेणी वातानुकुलीत डबे, दोन सामानवाहू आणि गार्ड ब्रेक व्हॅन्स असणार आहेत. रेल्वेच्या या निर्णयामुळे दक्षिण भारत आणि उत्तर भारत दरम्यानचा प्रवास अधिक सोयीचा आणि सुलभ होणार आहे.