
* पंढरपूरात२० लाखांहून अधिक वारकऱ्यांची उपस्थिती
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपुरात आषाढी एकादशीच्या दिवशी भक्तीचा महासागर उसळला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पहाटे अडीच वाजता सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. वारकरी प्रतिनिधी म्हणून नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथील शेतकरी कैलास दामू उगले यांना यंदाच्या महापूजेचा मान मिळाला.
कैलास उगले हे गेल्या बारा वर्षांपासून पंढरपूरला नित्यनेमाने वारीसाठी येत आहेत. यंदाही ते विठुरायाच्या चरणी हजेरी लावत महापूजेचा भाग बनले.
आषाढीच्या निमित्ताने पंढरपूर नगरीत तब्बल २० लाखांहून अधिक भाविक दाखल झाले असून, चंद्रभागा तीरावर पहाटेपासून स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. स्नानानंतर भाविकांनी संत नामदेव पायरीचे दर्शन घेत विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी २२ किलोमीटरपर्यंत पसरलेल्या रांगेत उभे आहेत. सुमारे ७५ हजार भाविक दर्शनासाठी रांगेत थांबले आहेत.
पंढरी नगरीत ठिकठिकाणी ‘विठू नामाचा’ गजर, टाळ-मृदुंगाच्या गजरात वातावरण भारावून गेले आहे. मंदिर, मठ, मंडळांमध्ये भजन, कीर्तन सुरू असून, भक्तीरसात न्हालेलं पंढरपूर अनुभवता येत आहे.
मंदिर समिती व प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी व्यापक सोयी-सुविधा करण्यात आल्या असून, दर्शन रांग, पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत, स्वच्छतागृहे आदींची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंदिर परिसरात एकेरी वाहतुकीची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
संत नामदेव पायरी, चौफाळा, मंदिर परिसरात सुरळीत व्यवस्थापन पाहायला मिळत असून, संपूर्ण पंढरपूर नगरी भक्तिरसात न्हालेली आहे.