मुंबई प्रतिनिधी
मुंबई : तब्बल वीस वर्षांनंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच व्यासपीठावर आले. मुंबईत झालेल्या या विजयी मेळाव्याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं होतं. या ऐतिहासिक मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधूंची उपस्थिती नोंदवण्यात आली.
या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना थेट शिवसेनेत प्रवेश करण्याचं आवाहन केलं आहे. “सुधीर मुनगंटीवार यांची परिस्थिती भाजपमध्ये फारशी समाधानकारक नाही. त्यांनी ठाकरे गटात यावं,” असं वक्तव्य अंधारे यांनी केले.
दोन्ही ठाकरे एकत्र आल्याबद्दल अंधारे म्हणाल्या, “या कुटुंबाला पुन्हा एकत्र येण्यासाठी वीस वर्षे लागली. आज ते एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत, यापेक्षा मोठा आनंद नाही. हा आनंद राज्याला साजरा करू द्या.”
दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील या मेळाव्यावर प्रतिक्रिया देताना दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्यामुळे महायुतीचाच फायदा होईल, असा दावा केला. “राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीत फूट पडेल. तिसरा गट निर्माण होईल आणि त्याचा फायदा महायुतीला होईल,” असं आठवले यांनी सांगितलं.
याशिवाय ठाकरे बंधूंवर हल्लाबोल करत आठवले म्हणाले, “आमचंही मराठीवर प्रेम आहे. केवळ त्यांना मेळावा घेण्याचा अधिकार नाही. मराठी माणसांसोबतच इतर लोकांचं देखील योगदान महत्त्वाचं आहे.”


