
मुंबई प्रतिनिधी
मुंबईच्या राजकारणात ऐतिहासिक ठरणाऱ्या एका मेळाव्याने शनिवारी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा एकत्रित “विजयी मेळावा” मुंबईत पार पडला. केंद्र सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात मराठी अस्मितेसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. शासनाने जीआर मागे घेतल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंनी विजयी जल्लोष साजरा केला.
Do bhaiyon ke sath aane par sabse zyada khush behen hoti hai!#SupriyaSule 🥰 pic.twitter.com/6aewiPBsAC
— Vini Kohli (@vinikkohli) July 5, 2025
झेंडा कुणाचाही नाही, एकत्र आले मराठी पक्ष!
या मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा तिथं नव्हता. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आदी विविध पक्षांचे नेतेही मंचावर एकत्र दिसले. मात्र संपूर्ण कार्यक्रमात एक कृती अशी घडली, जिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं – आणि ती होती सुप्रिया सुळे यांची.
ठाकरे बंधूंचं भाषण ज्वालामुखीसारखं
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात टोला लगावत म्हटलं, “बाळासाहेब ठाकरे यांना जे जमलं नाही, ते फडणवीसांनी करून दाखवलं – दोघा भावांना एकत्र आणलं!” त्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपावर घणाघात करत मनोभावे मराठीचा मुद्दा मांडला. दोन्ही भाषणांनी उपस्थित जनतेच्या मनात लाट निर्माण केली.
आणि चर्चेचा विषय ठरली ‘ती’ एक कृती!
नेतेमंडळी भाषणांनंतर मंचावर एकत्र जमली. फोटोसेशन सुरू होतं. हस्तांदोलनं, स्मितहास्यं… आणि याच वेळी सुप्रिया सुळे यांनी एक ‘दूरदृष्टीची’ कृती केली. त्यांनी अमित ठाकरे (राज ठाकरे यांचे पुत्र) आणि आदित्य ठाकरे (उद्धव ठाकरे यांचे पुत्र) यांना मंचावर एकत्र आणलं. त्यांचे हात हातात घेत त्यांना दोन्ही ठाकरे नेत्यांच्या शेजारी उभं केलं. आणि पुढच्या पिढीचं दृढसंकेत देणारं चित्र संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं.
सुळे यांची ‘राजकीय सर्जनशीलता’
चर्चेत हा क्षण केवळ एक फोटो नव्हता, तर एक भविष्यातल्या एकजुटीचा इशारा होता. आदित्य-अमित यांना एकत्र आणणं ही सुप्रिया सुळे यांची राजकीय दूरदृष्टी आणि मध्यस्थाची भूमिका अधोरेखित करणारी कृती होती. त्यामुळेच सध्या राजकीय वर्तुळात या दृश्याची मोठी चर्चा होत आहे.
मुंबईत वारं बदलणार का?
महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची ही एकजूट आणि सुळे यांची ती निर्णायक कृती भाजपा-शिंदे गटासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. आता महाविकास आघाडी आणि मनसे यांच्यात युतीची शक्यता उभी राहत असताना, येणाऱ्या काळात मुंबईतील राजकीय समीकरणं पूर्णतः उलथवून टाकली जातील का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
एकत्र आलेली ठाकरे बंधू आणि त्यांचं पुढील नेतृत्व, हे दृश्य फक्त मंचावरचं नसून, ते मराठी अस्मितेच्या नव्या पर्वाचं सूचक आहे. आणि या पर्वाची पहिली पायरी, एकत्र उभं राहणं ,सुप्रिया सुळे यांच्या शांत, पण प्रभावी हस्तक्षेपामुळे शक्य झाली.