
पालघर प्रतिनिधी
नालासोपाऱ्यातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या सातत्याने होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून शहरातील एक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जयप्रकाश चौहान यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
चौहान यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत दोन पोलीस शिपायांची नावे स्पष्टपणे नमूद केली असून, “माझ्या मृत्यूला शाम शिंदे आणि राजेश महाजन हेच जबाबदार आहेत,” असं त्यांनी नमूद केलं आहे. या चिठ्ठीमुळे पोलीस दलातही खळबळ उडाली असून, चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.
५० लाखांचे फायनान्स, दुप्पट रकमेचे आमिष
संयुक्त नगर, नालासोपारा (पूर्व) येथील ‘ओम श्री दर्शन’ या इमारतीचे पुनर्विकास काम जयप्रकाश चौहान यांच्या देखरेखीखाली सुरू होते. चौहान यांना आर्थिक मदतीची गरज असल्याने पोलीस शिपाई शाम शिंदे याने आपल्या नातलगाच्या माध्यमातून त्यांना ५० लाख रुपयांचे फायनान्स उपलब्ध करून दिले होते. या रकमेसाठी एका वर्षात दुप्पट परतावा देण्याचे लेखी किंवा तोंडी आश्वासन असल्याची माहिती समोर आली आहे.
याशिवाय, जामीन म्हणून चौहान यांच्याकडून चार फ्लॅट्सचा ताबाही घेतल्याची माहिती आहे. काही महिन्यांनी परताव्याची वेळ येताच शाम शिंदे, त्याचा सहकारी राजेश महाजन आणि लाला लजपत नावाच्या मध्यस्थाने पैसे परत मागण्याचा जोरदार तगादा लावला.
३२ लाख परत दिल्यावरही त्रास सुरूच
चौहान यांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी २२ लाख रुपये ऑनलाईन आणि १० लाख रुपये रोख स्वरूपात म्हणजे एकूण ३२ लाखांची रक्कम परत दिली होती. तरीही शाम शिंदे व सहकाऱ्यांनी त्रास देणं थांबवलं नाही. “ही इमारत आता आमची आहे, तू येथून निघून जा, अन्यथा तुला खोट्या गुन्ह्यात अडकवू,” अशी धमकी दिल्याचा आरोप चौहान कुटुंबियांनी केला आहे.
या मानसिक दबावाला कंटाळून अखेर जयप्रकाश चौहान यांनी आपल्या मुलाच्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. चिठ्ठीत त्यांनी स्पष्ट शब्दांत पोलिसांच्या त्रासामुळे हे पाऊल उचलल्याचे लिहिले आहे.
पोलीस दलावर गंभीर आरोप; सखोल चौकशीची मागणी
या प्रकरणामुळे संपूर्ण पोलीस दलाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमध्ये आणि चौहान कुटुंबीयांतून होत आहे.