
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळखीचा कणा असलेल्या पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने वारकऱ्यांसाठी अनेक दिलासादायक घोषणा केल्या आहेत. यंदा ६ जुलै २०२५ रोजी संपन्न होणाऱ्या आषाढी एकादशी वारीसाठी ‘विठ्ठल रखुमाई वारकरी योजना-2025’ अंतर्गत अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकारकडून लाखो रुपयांची मदत मिळणार आहे.
वारीदरम्यान कोणत्याही कारणाने वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास शासनाकडून ४ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तर, अपघातामुळे ६० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व आल्यास २.५ लाख रुपये, आणि ६०% पेक्षा कमी अपंगत्वासाठी ७४ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येईल. सरकारकडून याबाबत नवीन परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.
वारकऱ्यांसाठी इतर योजनांची घोषणाही
राज्य सरकारने वारकऱ्यांच्या कल्याणासाठी खालील योजना राबवण्यास सुरुवात केली आहे:
* मुख्यमंत्री वारकरी महामंडळ
१४ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन करण्यात आले असून, पंढरपूर येथे मुख्यालय असलेल्या या मंडळाच्या माध्यमातून पालखी मार्गावर निवारा, अन्न, वैद्यकीय मदत, विमा संरक्षण यांसारख्या सोयी-सुविधा पुरवण्याची योजना आखण्यात आली आहे.
* दिंडी अनुदान योजना
यंदा ११०९ दिंड्यांना प्रत्येकी २०,००० रुपये अनुदान देण्यात येणार असून, यासाठी एकूण २.२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मानाच्या १० पालख्यांसह सर्व दिंड्यांना हे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
* टोलमाफी व विशेष रेल्वे सेवा
वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी टोलमाफी जाहीर करण्यात आली असून, वारकऱ्यांच्या सोयीसाठी ८० विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर-मिरज मार्गावरील ४ विशेष गाड्यांचा समावेश आहे.
* “चरणसेवा” आणि “आरोग्यवारी” उपक्रम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली “चरणसेवा” उपक्रमांतर्गत वैद्यकीय सहाय्य, तर सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत “आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी” अभियान राबवण्यात येत आहे. या उपक्रमात मेडिकल शिबिरे, फिरती आरोग्य केंद्रे उभारली गेली आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि समर्थ युवा फाउंडेशन यांचाही सहभाग लाभला आहे.
* “माझी वारी, माझा संकल्प”
वारकरी वारी अधिक पर्यावरणपूरक व्हावी यासाठी “माझी वारी, माझा संकल्प” हे अभियान राबवले जात असून, वारी मार्गावरील गावांमध्ये मद्य व मांस विक्रीवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणावर विशेष भर दिला जात आहे.
* सुरक्षा आणि पायाभूत सुविधा
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पालखी मार्गावर ६,००० पोलीस कर्मचारी आणि ३,२०० होमगार्ड तैनात करण्यात आले असून, ड्रोनच्या माध्यमातून देखरेख केली जात आहे. पंढरपूर शहरात स्वच्छतागृहे, स्नानगृहे आणि वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आले असून, टोकन दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.
वन विभागाची सहभागिता
संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर चित्ररथ आणि कलापथकांच्या माध्यमातून महाराष्ट्र वन विभाग वारकऱ्यांपर्यंत विविध योजनांची माहिती पोहोचवतो आहे.
वारकरी भाविकांसाठी राबवण्यात येणाऱ्या या योजनांमुळे यंदाची वारी अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि स्मरणीय ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.