
अहिल्यानगर प्रतिनिधी
नगर तालुक्यातील रुईछत्तीसी गावच्या शिवारात ३० जून रोजी सकाळी एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली. वारी करून पंढरपूरहून परतणाऱ्या एका ज्येष्ठ वारकऱ्याने शेतातील कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
मिसळवाडी (ता. चिखली, जि. बुलढाणा) येथील ६२ वर्षीय सुखदेव लक्ष्मण रावे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. केस कर्तनाचा व्यवसाय करणारे रावे हे दरवर्षी पंढरपूरच्या वारीला नियमितपणे जात असत. यंदाही त्यांनी गावातून आळंदीसाठी प्रस्थान ठेवले होते. आळंदी ते पंढरपूर पायी दिंडीत सहभागी होऊन, नातेपुते येथे मुक्काम केल्यानंतर त्यांनी तिथून थेट एसटी बसने पंढरपूर गाठले.
विठोबाचं दर्शन घेतल्यानंतर ते पुन्हा एसटीने गावी परतत होते. मात्र २९ जून रोजी सायंकाळी रुईछत्तीसी गावाजवळ उतरून ते कुठेतरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी धर्मा अण्णा गोरे यांच्या शेतात असलेल्या कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रावे यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत. रावे यांच्या पश्चात पत्नी, तीन भाऊ, एक बहीण, एक मुलगा, एक मुलगी, सून आणि नातवंड असा मोठा परिवार आहे.
वारी संपवून घरी परतत असताना घडलेली ही दुर्दैवी घटना संपूर्ण परिसराला सुन्न करणारी ठरली आहे.