
धुळे प्रतिनिधी
उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसला मोठा धक्का देणारी घडामोड! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार कुणाल पाटील यांनी तब्बल ७५ वर्षांची निष्ठा संपवत भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईत भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पाटील यांचा पक्षप्रवेश पार पडला. या प्रवेशामुळे खान्देशातील राजकीय समीकरणे ढवळून निघणार असल्याचे बोलले जात आहे.
धुळे येथून शेकडो समर्थकांसह मुंबईत दाखल झालेल्या पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपला नवसंजीवनी मिळाली असून काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
“३ पिढ्यांचा वारसा सोडून आलो…”
पक्षप्रवेशानंतर बोलताना कुणाल पाटील म्हणाले, “आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मी माझ्या वडिलांचा आणि आजोबांचा काँग्रेसचा वारसा सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विकासासाठी हा निर्णय घेतला आहे. माझ्या वडिलांनी मला विकासाचा संस्कार दिला. त्यांनी मंत्री असतानाही सायकलने प्रवास केला. मला त्यांचाच वारसा पुढे न्यायचा आहे.”
“फडणवीस हे विकासपुरुष”
पाटील यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विशेष कौतुक करताना म्हटलं, “मी पूर्वी त्यांच्या विरोधात होतो, पण एकदा त्यांच्या कडे काम घेऊन गेलो तेव्हा त्यांनी कोणतेही राजकारण न करता ते काम केलं. फडणवीस हे खरंच विकासकाम करणारे नेता आहेत. त्यांनी धुळे जिल्ह्यासाठी ‘इशे ग्रोथ सेंटर’ उभारण्याचं आश्वासन दिलं आहे.”
“मी जुन्यांना अडसर ठरणार नाही”
पुढे बोलताना त्यांनी भाजपच्या जुन्या नेत्यांना आश्वस्त करत म्हटलं, “मी कुणालाही अडसर ठरणार नाही. दोन प्रेमाचे शब्द आणि थोडा सन्मान यापेक्षा मला काही नको. भाजपने येथे पक्षाची मशाल जपली आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. मीही धार्मिक आहे. भाजपात येताना एक मंत्र लिहून आणला आहे. लाट आल्यापासून माझं देवावरचं प्रेम अधिकच वाढलं आहे.”