
अंबड प्रतिनिधी
मराठा आरक्षणाचा आवाज पुन्हा एकदा बुलंद झाला आहे. “आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईहून परतणार नाही,” असा ठाम निर्धार करत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे यांनी पुन्हा रणशिंग फुंकले आहे. अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे रविवारी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत त्यांनी २९ ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या विराट मोर्चासाठी व्यापक तयारीचे आवाहन केले.
“राज्यभरात मराठा समाज एकवटला आहे. कोणीही समाजात फूट पाडू शकणार नाही. आता ही लढाई निर्णायक टप्प्यात आली आहे. दोन वर्षांपासून आम्ही संघर्ष करत आहोत, पण आता सरकारने आरक्षण न दिल्यास परतीचा मार्ग नाही,” असा इशारा त्यांनी दिला. या मोर्चामुळे संपूर्ण मुंबई ठप्प होणार, अशी स्पष्ट घोषणा त्यांनी केली.
गुलाल घेऊनच परतू!
“२७ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथून मोर्चाचे प्रस्थान होईल. पहिला मुक्काम शिवनेरी किल्यावर असेल. मुंबई गाठून गुलाल उधळल्याशिवाय परत फिरणार नाही,” असे सांगताना त्यांनी उपस्थितांमध्ये उत्साहाची लाट निर्माण केली. पुणे, मुंबई, अहिल्यादेवीनगर आदी ठिकाणच्या कार्यकर्त्यांना त्यांनी मोर्चा यशस्वी करण्याची जबाबदारी सोपवली.
“मुख्यमंत्र्यांशी वैर नाही, पण…”
जरांगे यांनी स्पष्ट केलं की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी वैयक्तिक वैर नाही, पण आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने आता ठोस भूमिका घ्यावी.” त्यांनी सर्वच पक्षांतील मराठा नेत्यांना उद्देशून आवाहन केलं की, “तुम्ही सरकारमध्ये असाल वा विरोधात, पण आता सरकारला जाब विचारण्याची वेळ आली आहे.”
देशमुख कुटुंबाला न्याय, कोपर्डी आरोपींना फाशी
संतोष देशमुख याच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या मराठा समाजाच्या भावना जरांगे यांनी अधोरेखित केल्या. “देशमुख कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय आणि कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
शिंदे समितीला मुदतवाढ हवी
मराठा आरक्षणासाठी नियुक्त शिंदे समितीचे काम अजून अपूर्ण असून, त्यासाठी आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणासाठी पुन्हा पेटलेल्या लढ्याला आता निर्णायक वळण मिळण्याची शक्यता आहे. २९ ऑगस्टच्या मोर्चाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून, सरकारसाठी हा मोठा आगाज ठरणार यात शंका नाही.