मुंबई प्रतिनिधी
राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत असून, महायुती सरकारसमोर विविध ज्वलंत मुद्द्यांचा खदखदता ढग घोंगावत आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक तयारी केली असून, पहिलीपासून हिंदी सक्तीपासून ते पुण्यातील आत्महत्येपर्यंत आणि पावसामुळे मुंबई-पुण्यातील जनजीवन विस्कळीत होण्यापासून ते शेतकऱ्यांच्या तगाद्यांपर्यंत विविध विषय अधिवेशनात गाजणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
सध्या राज्यभरात हिंदी सक्तीच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या संतप्त वातावरणाचा मोठा राजकीय पडसाद विधानभवनात उमटण्याची शक्यता आहे. जरी सरकारने निर्णय रद्द करत राजकीय झळ टाळण्याचा प्रयत्न केला असला, तरी विरोधक हे प्रकरण सहजासहजी सोडून देणार नाहीत.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासंदर्भात स्थानिक मंत्र्यांचाच विरोध असूनही सरकारने प्रकल्प रेटण्याचा घेतलेला निर्णय देखील वादग्रस्त ठरणार आहे. यासंदर्भात विरोधकांसह सत्ताधारी आमदारही सरकारला अडचणीत आणू शकतात.
प्रमुख मुद्दे जे अधिवेशन गाजवू शकतात:
* वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: पुण्यातील ही दुर्दैवी घटना सुसंस्कृत समाजाच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित करते. विद्यार्थिनीवर मानसिक दबाव आणि त्यामागील जबाबदारीचे राजकीय पडसाद उमटणार.
* मे-जूनमध्ये झालेल्या पावसाचा फटका: मुंबई, पुण्यासारख्या महानगरांचे पाणी तुंबल्याने झालेले हाल, सार्वजनिक वाहतुकीचा विस्कळीत झालेला गाडा, या मुद्द्यांवरून सरकारवर जबरदस्त ताशेरे ओढले जाणार.
* तळेगावजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने मृत्यू: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जी कारभारावर बोट ठेवलं जाणार. मृतांच्या कुटुंबीयांसाठी न्याय आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी विरोधक करणार.
* अकरावी प्रवेश प्रक्रियेतील अडचणी: ऑनलाइन प्रवेशात अनेक विद्यार्थ्यांची घालमेल सुरू आहे. तांत्रिक बिघाडांमुळे पालक आणि विद्यार्थी हैराण झाले असून, सरकारचा कारभार सत्तेत असूनही ठोस दिशाहीन असल्याची टीका होणार.
* ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत निधी वळवण्याचा आरोप: सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाच्या निधीतून लाभार्थ्यांना देण्यासाठी पैसे वळवण्याच्या निर्णयावरून सरकारला तोंड उघडण्यास भाग पाडले जाणार.
या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांचे तोंड बंद ठेवणं सरकारसाठी मोठं आव्हान ठरणार आहे. सत्ताधारी महायुतीकडे संख्याबळ असले तरी जनतेच्या भावना, प्रश्न, आणि अन्यायाची चीड अधिवेशनात पेट घेऊ शकते. विरोधकांनी मैदानात कंबर कसून उतरल्याने या पावसाळी अधिवेशनात खूप काही स्फोटक घडण्याची शक्यता नाकारता येत नाही!


