
मुंबई प्रतिनिधी
राज्याच्या मुख्य सचिवपदाच्या शर्यतीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि 1988 बॅचचे ज्येष्ठ IAS अधिकारी राजेशकुमार मीना यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते आज, 30 जूनपासून अधिकृतपणे पदभार स्वीकारणार आहेत.
राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचा कार्यकाळ आज संपत असून, त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर नवा मुख्य सचिव कोण होणार, याबाबत गेल्या काही आठवड्यांपासूनच चर्चा सुरू होती. सुजाता सौनिक यांच्यानंतर ज्येष्ठतेच्या निकषावरून राजेशकुमार मीना यांचे नाव आघाडीवर होते, आणि अखेर सरकारने त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केले.
मुख्य सचिवपदासाठी इकबालसिंह चहल (गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव) आणि भूषण गगराणी (मुंबई महापालिका आयुक्त) यांचीही नावे चर्चेत होती. मात्र राजेशकुमार मीना हे प्रशासनातील सर्वात ज्येष्ठ अधिकारी असल्याने, त्यांनाच पसंती देण्यात आली.
केवळ दोन महिन्यांची मुदत, पण वाढीची शक्यता
राजेशकुमार मीना हे ऑगस्ट 2025 मध्ये सेवानिवृत्त होणार असल्याने, त्यांच्याकडे मुख्य सचिव म्हणून काम करण्यासाठी फक्त जुलै आणि ऑगस्ट एवढाच कालावधी उपलब्ध आहे. मात्र, याच दरम्यान राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्यास, त्यांना मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी अजोय मेहता आणि नितीन करीर यांना अशाच प्रकारे निवडणूक काळात मुदतवाढ मिळाल्याचे उदाहरण आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय निर्णायक
मुख्य सचिव कोण असावा, याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतात. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि प्रशासकीय अनुभव पाहता, फडणवीसांनी सेवा ज्येष्ठतेच्या तत्वाला प्राधान्य देत मीना यांच्या नावावर मुहर मारली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राज्यकारभारासाठी अनुभवी नेतृत्व
राजेशकुमार मीना यांनी महसूल, गृह, नागरी पुरवठा, ग्रामविकास यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विभागांमध्ये वरिष्ठ पातळीवर काम केले आहे. प्रशासकीय जाण आणि निर्णयक्षमता यांमुळे त्यांच्याकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान राज्य कारभार सुरळीत राखण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या नियुक्तीमुळे आता मंत्रालयात नव्या नेतृत्वाची तयारी सुरू झाली असून, आगामी काळात त्यांच्या निर्णयशक्तीची कसोटी लागणार हे निश्चित आहे.