
नवी दिल्ली प्रतिनिधी
भारताच्या अत्यंत संवेदनशील आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या गुप्तचर यंत्रणा ‘रिसर्च अॅण्ड अॅनालिसिस विंग’ (रॉ) च्या प्रमुखपदी वरिष्ठ आयपीएस अधिकारी पराग जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानातील दहशतवादी तळांविषयी अचूक माहिती मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या जैन यांच्या खांद्यावर आता देशाच्या गुप्तचर मोहिमांची सर्वाधिकारशक्ती देण्यात आली आहे.
जैन सध्या एव्हिएशन रिसर्च सेंटर (ARC) चे प्रमुख आहेत. त्याआधी त्यांनी चंडीगडचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक, लुधियाना पोलिस उपमहानिरीक्षक आणि विदेशातील भारतीय वकिलातींमधील महत्त्वाची पदं यांसारख्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांच्या कार्यकाळात कॅनडा व श्रीलंका येथे त्यांनी विविध गुप्तचर व राजनैतिक समन्वयाची कामगिरी यशस्वीरित्या सांभाळली.
रवी सिन्हा यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपल्यानंतर पराग जैन येत्या १ जुलैपासून ‘रॉ’च्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारतील. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने या निर्णयाला मंजुरी दिली आहे. जैन हे १९८९ बॅचचे पंजाब केडरमधील आयपीएस अधिकारी असून त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल.
‘ऑपरेशन सिंदूर’व्यतिरिक्त त्यांनी कलम ३७० रद्द करणे, ऑपरेशन बालाकोट, तसेच जम्मू-काश्मीर आणि उत्तर भारतातील विविध दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये गोपनीय माहिती संकलन आणि विश्लेषणात निर्णायक भूमिका बजावली होती. या पार्श्वभूमीवर त्यांची निवड अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
दक्षिण आशियात मालदीव आणि बांगलादेशमधील राजकीय अस्थिरता, तसेच भारतविरोधी आंतरराष्ट्रीय प्रयत्न हे ‘रॉ’पुढील महत्त्वाचे आव्हान आहे. भारताच्या गुप्तचर मोहिमांना अधिक धारदार व सक्षम बनविण्याच्या जबाबदारीसह जैन यांच्यासमोर एक व्यापक रणनीती आखण्याचे आव्हान आहे.
गुप्तचर यंत्रणेतील या महत्त्वाच्या बदलामुळे देशाच्या सुरक्षा, सामरिक धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर दीर्घकालीन प्रभाव पडण्याची शक्यता असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.