
अमरावती प्रतिनिधी
अमरावती | सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना गुरुवारी अमरावतीहून संभाजीनगरला रवाना होताना ढगाळ वातावरण आणि पावसामुळे दोन तासांहून अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागली.
बुधवारी अमरावतीत त्यांचा जाहीर सत्कार पार पडला होता. गुरुवारी सकाळीच संभाजीनगरकडे प्रयाणाची तयारी सुरू झाली होती. मात्र, दृश्यमानता कमी असल्यामुळे बेलोरा विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोलने (एटीसी) विमानाला उड्डाणाची परवानगी नाकारली. परिणामी, दुपारी १ ते ३ या काळात चारचाकी वाहनाने जाण्याचा पर्याय देखील विचाराधीन होता.
दरम्यान, एटीसीकडून तीन वाजताच्या सुमारास उड्डाणासाठी परवानगी मिळताच प्रशासनाला सुटकेचा निःश्वास सोडावा लागला. दुपारी चार वाजता सरन्यायाधीश भूषण गवई हे पत्नी डॉ. तेजस्विनी आणि पुत्र जोतिरादित्य यांच्यासह चार्टर विमानाने संभाजीनगरकडे रवाना झाले.
यावेळी खासदार बळवंत वानखडे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त अरविंद चावरिया आणि जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी त्यांना निरोप देत शुभेच्छा दिल्या.
“ढगाळ वातावरण आणि पावसामुळे सुरुवातीला विमान उडू शकले नाही. मात्र, तीनच्या सुमारास परवानगी मिळाली आणि सरन्यायाधीश नियोजित वेळेत रवाना झाले. थोडीफार धावपळ झाली, पण हे रूटीन काम आहे,” अशी माहिती पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली.