
डोंबिवली प्रतिनिधी
डोंबिवलीतून भाजपसाठी मोठी राजकीय धक्का देणारी घटना समोर आली आहे. भाजपचे माजी स्थायी समिती सभापती आणि प्रभावी स्थानिक नेते विकास म्हात्रे यांनी आपल्या पत्नी आणि माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांच्यासह पक्षातील सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयाने भाजपमध्ये खळबळ उडाली असून, दोघांचाही शिवसेना (ठाकरे गट) प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
म्हात्रे दाम्पत्याने स्थानिक नेतृत्वाकडून मिळणाऱ्या सहकार्याच्या अभावावर नाराजी व्यक्त केली आहे. “आम्हाला वारंवार दुय्यम वागणूक दिली जाते, आमच्या प्रभागासाठी विकास निधी मिळत नाही. सत्तेत असूनही निधीचा अभाव आहे, हा प्रश्न नागरिक विचारतात. त्यामुळे आम्ही राजीनाम्याचा निर्णय घेतला,” असे म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
याआधीही वर्षभरापूर्वी त्यांनी नाराजीने राजीनामा दिला होता, मात्र आमदार रवींद्र चव्हाण यांच्या समजुतीनंतर त्यांनी पदावर पुनरागमन केले होते. पण आता त्यांनी थेट राजीनामा देत भविष्यातील पक्षप्रवेशाच्या चर्चांना जोर दिला आहे.
“सध्या सर्वच पक्षांशी चर्चा सुरू आहे. मात्र शिवसेना (ठाकरे गट) जर आम्हाला योग्य सन्मान आणि स्थान देईल, तर आम्ही त्यांच्यात प्रवेश करू,” असे सूचक विधान त्यांनी केले.
निवडणुकीआधी भाजपला धक्का
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने सर्वच पक्षांची रणनीती आखली जात आहे. महायुतीत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत असतानाच, भाजपमधून बाहेर पडण्याच्या घटनाही पक्षासाठी डोकेदुखी ठरत आहेत. विकास म्हात्रे यांच्यासारख्या प्रभावी स्थानिक नेत्याचा राजीनामा हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
या घडामोडींनी डोंबिवलीतील राजकारणात नवा रंग भरला असून, आगामी निवडणुकीत याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.