मुंबई प्रतिनिधी
भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातील प्रमुख एअर इंडिया कंपनीच्या लंडनहून मुंबईकडे येणाऱ्या AI-130 या प्रवासी विमानात उड्डाणादरम्यान भीतीदायक घटना घडली. या फ्लाइटमध्ये एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच प्रवासी आणि दोन केबिन क्रू सदस्य बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली.
ही घटना १ जून रोजी घडली असून, संबंधित विमान मुंबईत सुखरूप उतरल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र उड्डाणाच्या दरम्यान प्रवाशांना चक्कर येणे, मळमळ होणे आणि अचानक बेशुद्ध होणे अशा गंभीर लक्षणांनी प्रवाशांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मुंबई विमानतळावर सुरळीत लँडिंग, वैद्यकीय पथक तत्पर
एअर इंडिया AI-130 हे बोईंग 787 ड्रीमलाइनर विमान लंडनच्या हीथ्रो विमानतळावरून मुंबईकडे येत होते. प्रवासादरम्यान उड्डाणाच्या विविध टप्प्यांवर प्रवाशांनी अस्वस्थतेची तक्रार नोंदवली. विमानतळ प्रशासनाला याची माहिती देण्यात आल्यानंतर मुंबई विमानतळावर विमानाच्या आगमनासाठी वैद्यकीय पथक सज्ज ठेवण्यात आले.
विमान सुरक्षितपणे उतरल्यानंतर बेशुद्ध पडलेल्या दोन प्रवाशांना आणि दोन केबिन क्रू सदस्यांना तात्काळ वैद्यकीय कक्षात हलवण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
एअर इंडिया कंपनीकडून चौकशी सुरू, नियामक संस्थांना माहिती
घटनेबाबत एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही घटनेची सखोल चौकशी करत आहोत. नियामक संस्थांना यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही आमची प्राथमिकता आहे.”
दरवाजा सैल झाला, टिश्यू पेपरने बंद केला!
या प्रकाराबरोबरच एअर इंडियाच्या विमानांत तांत्रिक बिघाडांची मालिका सुरुच असल्याचेही दिसून येते. १ जून रोजीच एअर इंडियाच्या एका बोईंग 787 विमानात हवेत असताना दरवाजातून आवाज येण्याची घटना घडली होती. प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाल्यानंतर, दरवाजावरील फट टिश्यू पेपर भरून बंद करण्यात आल्याचा खळबळजनक खुलासाही समोर आला आहे.
ही घटना हाँगकाँगच्या दिशेने जात असलेल्या विमानात घडली होती. अहमदाबादच्या अलिकडील २४२ प्रवाशांचा बळी गेलेल्या दुर्घटनेपूर्वी ही घटना घडल्याचे उघड झाले आहे.
सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष?
अहमदाबाद दुर्घटनेनंतरही अशा प्रकारच्या घटना समोर येत असल्याने एअर इंडियाच्या सुरक्षाविषयक धोरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रवाशांच्या जीवितास धोका पोहोचवणाऱ्या या घटनांची पारदर्शक चौकशी होणे अत्यावश्यक ठरत आहे.


