
नवी दिल्ली वृत्तसंस्था
देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात एक हृदयस्पर्शी क्षण घडला. उत्तराखंडमधील डेहराडून येथे आयोजित कार्यक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भावगीतांनी भारावलेल्या राष्ट्रपतींच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले आणि त्या स्टेजवरच रडू लागल्या. हा क्षण सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
राष्ट्रपति द्रौपदी मुर्मु आज उस समय भावुक हो गईं जब राष्ट्रीय दृष्टि दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थान, देहरादून के छात्रों ने उनके लिए एक भावपूर्ण जन्मदिन गीत गाया। #DroupadiMurmu pic.twitter.com/sqCwpzjXo8
— आकाशवाणी समाचार (@AIRNewsHindi) June 20, 2025
राष्ट्रपती मुर्मू आज (२० जून) आपला ६७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. याच निमित्ताने त्यांनी डेहराडूनमधील राष्ट्रीय दृष्टी दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थेतील विद्यार्थ्यांसोबत दिवस घालवला. खास राष्ट्रपतींसाठी आयोजित या कार्यक्रमात मुलांनी “बार-बार ये दिन आए” हे गाणं सादर केलं. या गाण्याच्या सादरीकरणाने मुर्मू भावूक झाल्या. त्या स्टेजवरच रुमालाने अश्रू पुसताना दिसल्या. उपस्थित सुरक्षारक्षकांनी त्यांना रुमाल दिला, आणि गाणं संपेपर्यंत त्या सतत डोळे पुसताना दिसत होत्या.
या भावनिक प्रसंगानंतर राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिला आणि आपल्या भाषणात सांगितलं की, “दिव्यांगांसाठी केवळ सरकारनेच नव्हे, तर समाजानेही पुढाकार घ्यायला हवा. आपण सर्वांनी त्यांच्या सशक्तीकरणासाठी एकत्र काम केले पाहिजे.”
दरम्यान, राष्ट्रपतींना वाढदिवसानिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत म्हटलं, “राष्ट्रपती मुर्मू यांचं जीवन आणि कार्य हे देशवासीयांसाठी प्रेरणास्रोत आहे. त्यांची वंचित आणि उपेक्षितांसाठी असलेली कटिबद्धता ही सामाजिक न्यायाचा खरा अर्थ सांगणारी आहे.”
राष्ट्रपतींचा हा भावनिक क्षण संपूर्ण देशवासीयांच्या हृदयाला स्पर्शून गेला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कोवळ्या भावनांनी राष्ट्रपतींनाच नव्हे तर संपूर्ण समाजालाच एका नव्या जाणीवेची आठवण करून दिली