सातारा प्रतिनिधी
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व भाजपचे साताऱ्यातील करिश्माई नेते शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर आता साहित्य क्षेत्राची ऐतिहासिक जबाबदारी आली आहे. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शिवेंद्रसिंहराजे यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हेच मानाचे पद याआधी त्यांच्या वडिलांनी – अभयसिंहराजे भोसले यांनी १९९३ मध्ये भूषवले होते. त्यामुळे वडिलांचा वारसा जपत पुत्रही आता साहित्य परंपरेचा शिलेदार ठरणार आहे.
सातारा जिल्ह्यास तब्बल ३२ वर्षांनंतर मिळाला संमेलनाचा मान, आणि त्या अनुषंगानेच आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या साहित्य सोहळ्याकडे लागले आहे. १९९३ मध्ये भरलेले ६६वे संमेलन आजही साताऱ्याच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. आणि आता त्याच भूमीत होणारे ९९वे संमेलन हे नव्या पिढीला भाषेच्या वैभवाचा अनुभव देणारे ठरणार आहे.
या ऐतिहासिक संमेलनाच्या आयोजनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन या स्थानिक संस्थांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रस्तावानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने साताऱ्याला संमेलन आयोजित करण्याचा मान बहाल केला.
या पार्श्वभूमीवर साताऱ्यात आयोजित संयुक्त बैठकीत ज्येष्ठ साहित्यिक किशोर बेडकीहाळ यांनी शिवेंद्रसिंहराजेंच्या नावाची शिफारस स्वागताध्यक्षपदासाठी केली. उपस्थित सर्व साहित्यप्रेमी, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्याला एकमताने पाठिंबा दिला.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत ही अधिकृत घोषणा करताच, संपूर्ण सातारा जिल्ह्यात उत्साहाची लाट उसळली आहे. आता ही जबाबदारी पार पाडण्यासाठी शिवेंद्रसिंहराजेंसमोर सांस्कृतिक व साहित्यिक परंपरेच्या सन्मानाची कसोटी असणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात आणि खास करून साताऱ्याच्या राजेशाही वारशात शिवेंद्रराजेंनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता साहित्यविश्वातील ही नवी जबाबदारी ते कशी पार पाडतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
“वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत, शिवेंद्रसिंहराजेंनी सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याचा घेतला वसा – साताऱ्याच्या भूमीत पुन्हा एकदा इतिहास घडणार!”


