
नवी दिल्ली वृत्तसंस्था
देशातील टोल दरांच्या त्रासाला आता अखेरचा विराम मिळणार! केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिल्लीत पत्रकार परिषदेत फास्टॅग आधारित वार्षिक टोल पास जाहीर करून लाखो वाहनचालकांना दिलासा दिला आहे.
१५ ऑगस्टपासून या क्रांतिकारी योजनेची अंमलबजावणी होणार असून, अवघ्या ३ हजार रुपयांत एकदाच भरायचं आणि मग वर्षभर टोलचा झंझट नाही! कार, जीप, व्हॅन यांसारख्या बिगरव्यावसायिक वाहनधारकांसाठी ही सुविधा लागू असणार आहे.
हा पास एक वर्ष किंवा २०० प्रवासांपैकी जे आधी पूर्ण होईल तोपर्यंत वैध राहणार आहे. यामुळे टोल नाक्यांवरील गर्दी, वादविवाद, आणि वेळेचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर कमी होणार असल्याचा दावा गडकरींनी केला आहे.
“हा निर्णय म्हणजे वाहनचालकांसाठी एक ऐतिहासिक टर्निंग पॉइंट ठरेल,” असं गडकरी यांनी ठासून सांगितलं. “६० किमी अंतराच्या आत असणाऱ्या टोल नाक्यांवरून वारंवार प्रवास करणाऱ्यांना यामुळे प्रचंड दिलासा मिळणार आहे.”
लवकरच राजमार्ग यात्रा अॅप आणि NHAIच्या संकेतस्थळावर यासाठी स्वतंत्र लिंक उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर या पासचा उपयोग करता येईल.
या घोषणेमुळे टोलनाक्यांवरील कटकटी, तक्रारी आणि तांत्रिक अडथळ्यांवर सरकारनं ठोस उपाय शोधल्याचं स्पष्ट होत आहे. वाहनधारकांमध्ये याबाबत आनंदाचं वातावरण असून, ही योजना राबवण्यासाठी सरकारने तयार केलेली यंत्रणा आणि अंमलबजावणी कशी असते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.