नवी दिल्ली वृत्तसंस्था
एसबीआय क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या क्रेडिट कार्डसंबंधीच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हे बदल येत्या १५ जुलै २०२५ पासून प्रभावी होणार असून, ग्राहकांच्या खिशावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
किमान देय रक्कमेत मोठा बदल
एसबीआय कार्डने दिलेल्या माहितीनुसार, आता ‘Minimum Amount Due (MAD)’ म्हणजेच किमान देय रक्कम मोजण्याची पद्धत पूर्णपणे बदलली जाणार आहे. नवीन पद्धतीनुसार, ग्राहकांना खालील बाबी अनिवार्यपणे भराव्या लागणार आहेत:
१००% जीएसटी
१००% वित्त शुल्क
१००% इतर शुल्क व दंड
१००% ईएमआय
आणि थकबाकीवरचा २% अतिरिक्त शुल्क
याचा थेट परिणाम म्हणजे, आधी जिथे ग्राहक किमान १७,३१३ रुपये देत होते, तिथे आता २०,०१३ रुपये पर्यंत रक्कम भरावी लागू शकते.
हवाई अपघात विम्याला ‘गुडबाय’
एसबीआय क्रेडिट कार्डधारकांना मिळणारा मोफत हवाई अपघात विमा देखील बंद होणार आहे. १५ जुलैपासून १ कोटी रुपयांपर्यंतचा विमा लाभ रद्द केला जाणार असून, खालील कार्डधारक यापुढे या संरक्षणासाठी पात्र राहणार नाहीत:
SBI कार्ड एलिट
SBI माइल्स एलिट
SBI माइल्स प्राइम
SBI प्राईम
SBI कार्ड पल्स
या कार्डधारकांना मिळणारा ५० लाख रुपयांपर्यंतचा विमा कवच देखील या तारखेपासून संपुष्टात येणार आहे.
११ ऑगस्टपासूनही आणखी सेवा बंद
फक्त १५ जुलैलाच नव्हे, तर ११ ऑगस्ट २०२५ पासून काही इतर कार्डांवरील विमा सुविधा देखील बंद होणार आहेत. त्यामध्ये खालील कार्डांचा समावेश आहे:
UCO बँक SBI कार्ड एलिट
Central Bank of India SBI कार्ड एलिट
PSB SBI कार्ड एलिट
KVB SBI कार्ड एलिट
काय करावे?
ग्राहकांनी या नव्या नियमांची गंभीर दखल घ्यावी, कारण यामुळे कार्डची परतफेड वेळेत न केल्यास मोठा दंड आणि आर्थिक ताण येऊ शकतो. तसेच विमा संरक्षण बंद होणार असल्याने स्वतंत्र विमा योजना घेणे देखील गरजेचे ठरेल.


