मुंबई प्रतिनिधी
मुंबई | देशाच्या आर्थिक राजधानीतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज शेकडो उड्डाणं होतात. मात्र, या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाला लागूनच असलेल्या चार ते पाच मजली झोपड्यांमुळे मोठ्या दुर्घटनेचा धोका कायम आहे. या भागातील रखडलेले पुनर्वसन यावर राजकीय मतभेद असल्याने विमानप्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
विमानतळावरील टर्मिनल 1 आणि 2 वरून उड्डाण करणाऱ्या विमानांसमोर झोपड्यांचा अडथळा असून, टर्मिनलसमोरील मोठ्या भूभागात असलेल्या फनेल झोनचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ही बाब पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून फनेल झोनमधील इमारती आणि झोपड्यांचे पुनर्वसन रखडलेले आहे.
विलेपार्ले, सांताक्रूझ, कुर्ला, साकीनाका या भागांतील अनेक इमारती फनेल झोनच्या अटींमुळे बाधित झाल्या आहेत. या ठिकाणी पुनर्विकासाची प्रक्रिया वर्षानुवर्षे रखडलेली आहे. विधानसभा आणि मंत्रिमंडळ पातळीवर यावर चर्चा होत असली तरी निर्णयासाठी ठोस कृती नाही. विधानसभेत विलेपार्लेचे आमदार पराग अळवणी आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यात या विषयावर मतभेद असल्याचं उघड झालं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन एमएमआरडीएला फनेल झोनमधील इमारतींसंदर्भात हरकती मागवण्याचे आदेश दिले आहेत. शिंदे यांनी स्पष्ट केले की, धोरण ठरवताना नागरिकांच्या सूचना आणि अडचणींचा विचार केला जाईल.
विमानतळ प्राधिकरणाच्या 1,980 एकर जागेपैकी 300 एकर क्षेत्र झोपड्यांनी अतिक्रमित केले असून, या ठिकाणी कोणत्याही क्षणी दुर्घटना होऊ शकते, अशी चिंता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अनेक पक्षांच्या नेत्यांनी झोपडपट्ट्या हटवण्याला विरोध केल्यामुळे प्रशासन अडचणीत आले आहे. भविष्यात जर दुर्घटना घडली, तर जबाबदारी कोणाची? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
आ. पराग अळवणी (विलेपार्ले विधानसभा)
“शासनाने नागरिकांच्या हरकती व सूचना लवकरात लवकर पूर्ण करून त्यांना दिलासा द्यावा. ही प्रक्रिया अधिक वेळ न लावता कार्यवाही व्हावी.”
खा. रवींद्र वायकर (मुंबई उत्तर पश्चिम)
“विमानतळाजवळील झोपड्यांचे पुनर्वसन करून तेथे अतिरिक्त धावपट्टी उभारावी. फनेल झोनमधील नियमांमध्ये बदल करून जुने प्रकल्प मार्गी लावावेत. संयुक्त बैठक घेऊन निर्णय घ्या.”
मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरात जागतिक दर्जाचं विमानतळ असूनही सुरक्षेच्या बाबतीत गंभीर अनास्था दिसून येते. फनेल झोन आणि अतिक्रमणाचा प्रश्न जर लवकर मार्गी लागला नाही, तर भविष्यातील दुर्घटना अटळ ठरू शकते. शासनाने आणि स्थानिक प्रतिनिधींनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून तातडीने उपाययोजना करण्याची वेळ आली आहे.


