
डोंबिवली | प्रतिनिधी
राज्यात फसवणुकीच्या घटनांना उधाण आले असताना डोंबिवलीत आणखी एक धक्कादायक आर्थिक घोटाळा समोर आला आहे. आकर्षक नफ्याचे आमिष दाखवून तब्बल ७८ गुंतवणूकदारांची सुमारे ३ कोटी ७० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक डोंबिवली पूर्वेतील बापूसाहेब फडके रस्त्यावर आणि डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रोड येथील दोन कार्यालयांमधून करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.
तक्रारदार महेश रमेश भोईर (रा. कुंभारखाणपाडा, डोंबिवली पश्चिम) यांनी यासंदर्भात रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भोईर हे डोंबिवलीत वाहन धुलाई केंद्र चालवतात. मे २०२१ ते जुलै २०२२ या कालावधीत ही फसवणूक झाल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.
तक्रारीनुसार, बापूसाहेब फडके रस्त्यावरील आनंदी आनंद सोसायटीमधील ‘फिनिक्स इन्व्हेस्टमेंट’ व सुभाष रोडवरील पुष्पहास सोसायटीतील ‘फिनिक्स फायनान्शियल सोल्युशन एल. एल. पी.’ या दोन कार्यालयांमधून ही आर्थिक फसवणूक करण्यात आली. कंपनीच्या भागीदारांनी आणि कर्मचाऱ्यांनी ‘जलद व आकर्षक परतावा’ देण्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या योजनेत पैसे गुंतवायला प्रवृत्त केले.
गुंतवणूकदारांना इंग्रजी भाषेतील प्रमाणपत्रे देण्यात आली होती. त्यामुळे गुंतवणूक सुरक्षित असल्याचा त्यांना विश्वास वाटला. मात्र, गुंतवणूक कालावधी संपल्यानंतर ना नफा देण्यात आला, ना मूळ रक्कम परत करण्यात आली. विरोध केल्यावर संबंधित भागीदार व कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
या प्रकरणी गौरम राम भगत, विकीन वसंत पटणे, देवेंद्र यशवंत तांबे, परेश हनुमान भोईर, दर्शन ज्ञानेश्वर म्हात्रे, दीपेश दत्ताराम दांडेकर, अर्चना कळंगे आणि गीता ठक्कर या आठ जणांविरुद्ध भारतीय दंड विधान संहितेतील विविध कलमांखाली तसेच ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा’ (MCOCA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरळे पुढील तपास करत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसली तरी आणखी काही गुंतवणूकदार पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे डोंबिवली परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी नागरिकांना अशा मोहक योजनांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.