
पुणे प्रतिनिधी
गुन्हे उकलण्यात कौशल्य दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव, विविध गुन्ह्यांतील तपास कौतुकास्पद
पुणे | गुन्ह्यांच्या प्रभावी तपासाद्वारे समाजात विश्वास निर्माण करणाऱ्या महाराष्ट्रातील अकरा पोलिस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचा ‘केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक – २०२२’ नुकतेच प्रदान करण्यात आले. पुण्यातील पोलिस संशोधन केंद्रात शुक्रवारी (१३ जून) आयोजित कार्यक्रमात राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते या अधिकाऱ्यांना पदक व प्रशस्तीपत्र देण्यात आले.
२०१८ ते २०२२ या कालावधीत राज्यातील एकूण ५४ अधिकाऱ्यांना हा सन्मान मिळालेला आहे. यावर्षी सन्मानित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये पोलिस उपायुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय पोलिस अधिकारी आदींचा समावेश आहे.
कार्यक्रमाला पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त महासंचालक सुनील रामानंद, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विनयकुमार चौबे, विशेष महानिरीक्षक डॉ. राजेंद्र डहाळे, उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली, अधीक्षक पल्लवी बर्गे, सौरभ अग्रवाल, पी. आर. पाटील, वैशाली माने यांच्यासह पदकविजेते अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुन्हे अन्वेषणात ठसा उमटवणारे अधिकारी :
कृष्णकांत उपाध्याय (पोलिस उपायुक्त, मुंबई): पंचायत समिती सचिवाच्या हत्या प्रकरणात मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपींना अटक. न्यायालयाने तीन आरोपींना जन्मठेप.
प्रमोद तोरडमल (वरिष्ठ निरीक्षक, कुर्ला): ओळख न पटलेल्या महिलेच्या मृतदेहाचा तपास करत आरोपी निष्पन्न. अवघ्या २० दिवसांत गुन्हा उघडकीस.
मनोज पवार (सहायक निरीक्षक, मंद्रूप): चिमुकलीच्या अपहरण व खून प्रकरणात आरोपीच्या रेखाचित्राद्वारे अटक. आरोपीला मरेपर्यंत फाशी.
दिलीप पवार (निरीक्षक, कोल्हापूर): ६६ लाखांच्या दरोड्याचा तपास करत २० आरोपींना अटक. सर्व मुद्देमाल जप्त.
अशोक विरकर (पो. अधीक्षक, एटीएस): सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि खून प्रकरणात दोषीला १२ वर्षांची शिक्षा. देशातील पहिली अशा स्वरूपातील केस.
अजित पाटील (उपविभागीय अधिकारी, सोलापूर): महिलेच्या हत्येचा १०२ दिवसांच्या तपासानंतर मुख्य आरोपी अटकेत.
राणी काळे (सहायक निरीक्षक, नवी मुंबई): ३७७ किलो गांजा जप्त; आरोपींना १३ वर्षांची शिक्षा व दंड.
दिपशिखा वारे (निरीक्षक, खेरवाडी): बनावट लसीकरण प्रकरणात ११ आरोपींना अटक; २२५९ पानी दोषारोपपत्र दाखल.
सुरेशकुमार राऊत (उपअधीक्षक, लातूर): बँक दरोडा उघडकीस; २.५ कोटींचा मुद्देमाल परत मिळवला.
जितेंद्र वनकोटी (वरिष्ठ निरीक्षक, पेल्हार): १.५ कोटींच्या दरोड्याचा तपास. आरोपींना मोक्का अंतर्गत अटक.
समीर अहिरराव (निरीक्षक, वसई विरार): सराफाच्या हत्येप्रकरणात मास्क घातलेल्या आरोपींना अटक.
राज्यस्तरावरून २२ शिफारसी, ११ निवड
गुन्हे अन्वेषण विभाग, आस्थापना आणि क्षेत्रीय विशेष महानिरीक्षकांच्या समितीकडून निवड झालेल्या २२ अधिकाऱ्यांची यादी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवण्यात आली होती. त्यामधून ११ अधिकाऱ्यांची निवड अंतिम करण्यात आली.
पोलीस तपासाची गुणवत्ता हाच न्याय व्यवस्थेचा आधार – रश्मी शुक्ला
“समाजात कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलीस तपासाची गुणवत्ता महत्त्वाची आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेतली जाते,” असे गौरवोद्गार पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी यावेळी म्हटले