
मुंबई प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश मुख्यालयात रविवारी राष्ट्रवादी (शरद पवार गट) काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्ह्यातील प्रमुख नेते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजित पाटणकर यांनी आपल्या सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
या प्रवेशप्रसंगी पक्षाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटणकर यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. त्यांना भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले, सातारा लोकसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार अतुलबाबा भोसले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे संचालक भरत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्यजित पाटणकर यांचा भाजपमध्ये झालेला प्रवेश सातारा जिल्ह्यातील राजकारणात महत्वाचे पाऊल मानले जात आहे.