
उमेश गायगवळे मो. 9769020286
वसई-विरारपासून ते चर्चगेटपर्यंत, कर्जत-कसाऱ्यापासून ते कुलाब्यापर्यंत आणि पनवेल ते सीएसएमटी पर्यंतच्या उपनगरी रेल्वेमार्गावर दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. कुणी नोकरीसाठी, कुणी शिक्षणासाठी, कुणी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी, सगळेच या धावपळीत सामील आहेत. पण ही धावपळ कधी कधी मृत्यूच्या कवाडाजवळ नेऊन उभी करते… आणि मग वाटतं, ही धावपळ आपल्याला कुठे घेऊन चालली आहे?
मुंबई शहर , देशाची आर्थिक राजधानी. रोज लाखो स्वप्नांना जपणारी, पण त्या स्वप्नांच्या धडपडीत अनेक जीव गमावणारी. रेल्वेच्या दरवाजात उभं राहणं, प्लॅटफॉर्मवरून थेट रुळ ओलांडत धावणं, धावत्या लोकलमध्ये चढणं… हे सगळं आता अंगवळणी पडलंय. पण त्याचं परिणाम किती भयावह असतो हे परवा मुंब्रा स्थानकाजवळ घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत दिसून आलं. पाच निरागस जीव गेले, तेरा जखमी झाले. कुणीतरी सकाळी घरातून निघालं होतं “लवकर ये” म्हणत मागे राहिलेल्या चेहऱ्यांकडे पाहून. पण ते परतच आलं नाही…
परप्रांतीयांचे लोंढे, वाढती लोकसंख्या, मुंबईच्या मर्यादा – हे सगळं खरं आहे. पण याच्याही पुढे जाऊन एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे: आपली जबाबदारी काय? रेल्वे प्रशासन उद्घोषणा करत राहतं – “पुलाचा वापर करा”, “दरवाज्यात उभं राहू नका”… पण आपणच त्या सूचना उडवून लावत असतो. आणि मग जेव्हा अशा दुर्घटना घडतात, तेव्हा दोष कुणाला द्यायचा?
रेल्वे प्रशासनाने गेल्या काही वर्षांत काही चांगल्या सुविधा दिल्या आहेत, काही कामं सुरूही आहेत, पण प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत ती अपुरीच वाटतात. त्यामुळे प्रश्न उभा राहतो – मुंबईच्या या रेल्वे व्यवस्थेला जीव घेणारी गर्दी म्हणून ओळख दिली जाईल का?
दररोज घराबाहेर पडताना एक क्षण थांबा… विचार करा आपली कोणी तरी वाट बघतंय. एक फोन, एक मेसेज, एक नजर… त्यासाठी तुम्ही हवे आहात. मग का हा जीव धोक्यात घालून प्रवास?
एका माणसाच्या अपघातात संपूर्ण घराचे भविष्य तुटलं जात..
“उशीर झाला तरी चालेल पण घरी परत या”
अनेकदा आपण ट्रेनमध्ये चढताना जीव धोक्यात घालतो – वेळेची घाई, ऑफिसची गरज, लेटमार्कची भीती… पण त्या काही मिनिटांच्या वेळेच्या बदल्यात आपण आपल्या घरच्यांना संपूर्ण आयुष्याची पोकळी देतो.
एक लोकल चुकली तरी चालेल…
पण आयुष्याची संध्याकाळ कुणाच्या दारात वेळेपेक्षा आधी येऊ नये.
“एक साद, थांबा क्षणभर, विचार करा…”!
“आपण ट्रेनमध्ये चढताना डब्याच्या दरवाज्यातून लटकतो तेव्हा आपल्या मागे कुणीतरी वाट पाहत असतं – बाळ, बायको, आई, वडील, भाऊ, बहीण…
“त्यांच्या चेहऱ्यांचा विचार करा
कारण प्रवास संपल्यावर तिकीट फेकता येईल,
पण आयुष्य फेकता येत नाही.”
“आपण घरी पोहोचलो की घर पुर्ण होतं…
म्हणून लाख अडचणी असू देत,
जीवन अमूल्य आहे. रेल्वे प्रशासनाने उपाय योजना कराव्यातच, पण प्रवाशांनीही सावधगिरी बाळगणं तितकंच गरजेचं आहे. अपघातानंतरच जाग येणं हे आपल्या संवेदनशीलतेचं लक्षण नव्हे.
“आधीच सावध व्हा, सुरक्षित रहा.
कारण “आपली कुणीतरी वाट बघतयं..”
हे विसरू नका…!