पत्रकार|उमेश गायगवळे
वांद्रे |ज्यांनी शब्दांनी वादळ निर्माण केलं, आणि हिंदुत्वाला अभिमानाने मस्तक उंचावण्याचं बळ दिलं, अशा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने वांद्रे-कुर्ला संकुलाचे नामकरण व्हावे,” अशी मागणी शिवसेना (शिंदे गटचे) वांद्रे विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांनी आज केली.
या मागणीसाठी सरमळकर यांनी महाराष्ट्राचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांची भेट घेतली आणि याबाबतचे निवेदन सादर केले. त्यांनी सांगितले की, “वांद्रे परिसर म्हणजेच बाळासाहेबांचा विचाराचा गड आहे. इथूनच त्यांनी हिंदुत्वाचा नारा बुलंद केला. त्यामुळे या परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणाला त्यांच्या नावाने ओळख मिळावी, ही काळाची गरज आहे.”
बाळासाहेब ठाकरे हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर लाखो तरुणांच्या आशेचा किरण होते. त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेने मराठी अस्मिता आणि हिंदुत्व या मुद्द्यांवर रस्त्यावर उतरून लढा दिला. त्यांच्या कार्याची आणि आठवणींची जाणीव जपण्यासाठी ‘बाळासाहेब ठाकरे कॉम्प्लेक्स’ हे नाव उपयुक्त ठरेल, असे सरमळकर यांनी स्पष्ट केले.
परिसरातील शिवसैनिक आणि नागरिकांमध्येही या मागणीला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. “हा केवळ नामांतराचा प्रस्ताव नसून, एका विचारधारेच्या स्मृतींचा गौरव आहे,” असंही मत व्यक्त केलं जात आहे. यावर सकारात्मक निर्णय लवकरच होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


