
मुंबई प्रतिनिधी
मुंबई|गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीत एका अवघ्या १४ वर्षीय शाळकरी मुलीने मोबाईल न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आई-वडिलांकडून सतत मोबाईलची मागणी करूनही तो न मिळाल्याने घरात वाद होतो होता. अखेर मोबाईल न मिळाल्याच्या कारणावरून मुलीने गळफास लावून आत्महत्या केली.
ही घटना आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत युनिट २२ मध्ये घडली असून, संपूर्ण परिसरात मोठी खळबळ माजली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी गेल्या काही दिवसांपासून सतत आई-वडिलांकडे मोबाईलची मागणी करत होती. मात्र आई-वडिलांनी मोबाईल देण्यास नकार दिल्यामुळे घरात वारंवार वाद होत होते.
शुक्रवारी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास, आई-वडील कामानिमित्त घराबाहेर असताना मुलीने घरातच गळफास लावून जीवन संपवलं. आई-वडील घरी परतल्यावर त्यांनी ही घटना पाहून तातडीने स्थानिकांच्या मदतीने पोलिसांना कळवले. आरे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, एका मोबाईलसारख्या गोष्टीसाठी एवढं टोकाचं पाऊल उचलण्यात आल्याने पालकत्वाच्या जबाबदाऱ्यांवर आणि मोबाईलच्या वाढत्या व्यसनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.