नवी दिल्ली वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमिअर लीग २०२५ चे उर्वरित सामने एका आठवड्यासाठी तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित अधिकारी आणि भागधारकांशी सल्लामसलत करून परिस्थितीचा व्यापक आढावा घेतल्यानंतर स्पर्धेचे नवीन वेळापत्रक आणि ठिकाणांबाबत पुढील अपडेट्स योग्य वेळी जाहीर केले जातील, असे BCCI ने स्पष्ट केले आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावामुळे बहुतेक फ्रँचायझींनी त्यांच्या खेळाडूंसाठी चिंताा व्यक्त केली. प्रसारक, प्रायोजक आणि चाहत्यांच्या मतांनंतर सर्व प्रमुख भागधारकांशी योग्य सल्लामसलत केल्यानंतर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने हा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयला भारताच्या सशस्त्र दलांच्या ताकदीवर आणि तयारीवर पूर्ण विश्वास आहे. बोर्डाने सर्व भागधारकांच्या सामूहिक हितासाठी हा निर्णय घेतला आहे, असेही बोर्डाने स्पष्ट केले.

निवेदनात म्हटले आहे की, ‘या महत्त्वाच्या टप्प्यावर, बीसीसीआय देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आम्ही भारत सरकार, सशस्त्र दल आणि आपल्या देशातील लोकांसोबत आमची एकता व्यक्त करतो. आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्य, धैर्य आणि निःस्वार्थ सेवेला BCCI सलाम करते.’ दरम्यान विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी, मयांक अग्रवाल, सूर्यकुमार यादव या भारतीय खेळाडूंनीही भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम केला आहे.
क्रिकेट हा एक राष्ट्रीय उत्साह असला तरी, राष्ट्र आणि आपल्या देशाच्या सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षिततेपेक्षा मोठे काहीही नाही. भारताचे रक्षण करणाऱ्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी बीसीसीआय दृढपणे वचनबद्ध आहे आणि नेहमीच राष्ट्राच्या हितासाठी आपले निर्णय संरेखित करेल, असेही या निवेदनात म्हटले आहे.


