नवी दिल्ली वृत्तसंस्था
दिल्ली आणि एनसीआर परिसरात शुक्रवारी सकाळी हवामानाने अचानक यू-टर्न घेतला आणि जोरदार वादळासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, विविध भागांत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

छावला परिसरात जोरदार वाऱ्यामुळे एका घरावर झाड कोसळून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याशिवाय, अनेक ठिकाणी झाडे आणि विजेच्या तारांचा पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे.
पावसामुळे दिल्लीतील अनेक रस्ते जलमय झाले असून, मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. कार्यालयीन वेळेत पावसाने हजेरी लावल्याने शेकडो नागरिकांना कार्यालये आणि शाळांमध्ये पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही तासांत ७० ते ८० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, दिल्लीसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

या खराब हवामानामुळे विमानसेवांवरही परिणाम झाला असून, दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर १०० हून अधिक फ्लाईटचे वेळापत्रक कोलमडले आहे.
प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आणि आवश्यक असल्यासच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.


