
श्रीनगर वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलातील एका अधिकाऱ्याचाही मृत्यू झालाय. दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला असून १६ जणांची नावे समोर आली आहेत.
त्यात लेफ्टनंट विनय नरवाल या नौदल अधिकाऱ्याचंही नाव आहे. ते कोच्चीमध्ये तैनात होते. गेल्या आठवड्यातच विनय नरवाल यांचं लग्न झालं होतं. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात नरवाल यांचा मृत्यू झाला.
लेफ्टनंट विनय नरवाल हे मूळचे हरियाणाचे होते. गेल्या आठवड्यात १६ एप्रिलला त्यांचं लग्न झालं होतं. लग्नानंतर ते पहलगामला फिरायला गेले होते. सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दहशतवाद्यांच्या गोळीबारात नौदलाचे अधिकारी विनय नरवाल यांचा मृत्यू झाला.
पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात फक्त पुरुषांनाच टार्गेट करण्यात आल्याची माहिती समजते. मृत्यू आणि जखमी झालेल्यांमध्ये पुरुषांचीच नावे समोर आली आहेत. दहशतवाद्यांकडून पुरुषांना त्यांचं नाव आणि धर्म विचारण्यात आला. मुस्लिम नसल्याचं ऐकताच त्यांनी गोळ्या झाडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
दहशतवादी हल्ल्याचे काही फोटो आणि व्हिडीओसुद्धा समोर आले आहेत. ३ ते ५ मिनिटं अंधाधुंद गोळीबार करून दहशतवादी फरार झाले. हल्ल्यानंतरचा एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात ती म्हणते की, मी आणि पती भेळपुरी खात होतो. तिथं दहशतवादी आले, त्यांनी पतीला मुस्लिम आहात का विचारलं आणि गोळ्या झाडल्या.