
नवी दिल्ली वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या वाढली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दहशतवाद्यांनी पर्यटकांवर 50 हून अधिक राउंड गोळीबार केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वतः दिल्लीहून श्रीनगरला रवाना झाले आहेत आणि पंतप्रधान मोदींनी अमित शहांशी फोनवरून बोलले आहे यावरून परिस्थितीचा अंदाज येतो. जखमीमध्ये पुणे आणि मुंबईतील पर्यटकांचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच जखमीमध्ये 2 जण महाराष्ट्रातील पर्यटक असल्याचं सांगण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या संपर्कात आहेत. त्यांनी काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन माहिती घेतली आहे. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला असून दिलीप डिसले, अतुल मोने असं मृतांची नावं आहेत.
तर जखमींमधील एक पनवेलचे तर उर्वरित 1 महाराष्ट्रातील कोणत्या भागातील याचा शोध घेण्यात येत आहे. जखमींची काश्मीर प्रशासनाने कळविलेली नावे ही माणिक पटेल पनवेल, एस. भालचंद्रराव अशी असून सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी म्हणाले की, पहलगाव दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या कुटुंबाची माहिती अद्याप निश्चित झालेली नाही. ते सतत सरकारच्या संपर्कात आहेत आणि लवकरच तपशील जाहीर केला जाईल. प्राथमिक माहितीनुसार, कुटुंबातील 5 सदस्यांपैकी 2 जण गंभीर स्थितीत आहेत.
या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांमध्ये विनो भट, माणिक पाटील, गुजरातचे रेनो पांडे, एस बालचंद्रू, महाराष्ट्राचे डॉ. परमेश्वर, अभिजवन राव, कर्नाटकचे अभिजवम राव, तामिळनाडूचे शंत्रू आणि ओडिशातील शशी कुमारी यांचा समावेश आहे
मिळालेल्या माहितीनुसार 10 दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या 10 दहशतवाद्यांमध्ये 6 दहशतवादी हे स्थानिक होते तर 4 दहशतवादी हे परदेशी असल्याचं सांगण्यात येतं आहे. सुरक्षा यंत्रणांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहलगाममधील दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानच्या सुनियोजित कटाचा भाग आहे, असं सांगण्यात येतं आहे.
या कटात पाकिस्तानने लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांचा वापर केला आहे, जे आता छोटे हल्लेखोर गट तयार करत आहेत आणि निष्पाप लोकांना मारत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आजचा हल्ला अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वी यात्रेकरू आणि पर्यटकांमध्ये भीती पसरवण्यासाठी करण्यात आला आहे, असं सांगण्यात येत आहे. सोनमर्गमध्येही असाच हल्ला झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आजच्या हल्ल्यानंतर, असे मानलं जातं की टीआरएफ (द रेझिस्टन्स फ्रंट) चे “फाल्कन स्क्वॉड” येत्या काळात काश्मीरमध्ये एक मोठे आव्हान बनण्याची शक्यता आहे.
या गटाला लक्ष्य हत्या आणि नंतर जंगलात किंवा उंच ठिकाणी लपून बसणे याबद्दल चांगले माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार की फाल्कन स्क्वॉडला अलीकडेच मोठ्या प्रमाणात प्रगत शस्त्रास्त्रे मिळाली आहेत, जी आता हल्ल्यांमध्ये वापरली जात आहेत. गुप्तचर अहवालांनुसार, फाल्कन स्क्वॉड सोशल मीडियाद्वारे आपले नवीन सदस्य जोडत आहे.
हा गट ‘हिट अँड रन’ या धोरणावर काम करतो आणि OGW (ओव्हर ग्राउंड वर्कर्स) च्या सहकार्याने ऑपरेशन्स करतो. टीआरएफ ही प्रत्यक्षात लष्कर-ए-तैयबाची एक आघाडी आहे आणि फाल्कन स्क्वॉड त्याचा एक भाग आहे. लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आता थेट अशा हल्ल्यांचे आदेश देत आहेत. या प्रकरणाचा तपास एनआयए घेणार आहे. दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतेच सोनमर्गला भेट दिली होती आणि ते बुधवारी पहलगामलाही पोहोचतील.
सूत्रांच्या माहितीनुसार हल्ला करणारे दहशतवादी काही दिवसांपूर्वीच पहलगावमध्ये आले होते. आधी रेकी केली आणि नंतर संधी मिळताच हल्ला केला, असं सूत्रांनी सांगितलं आहे.