
सातारा प्रतिनिधि न्युज नेटवर्क.
कोरेगाव हा मतदारसंघ सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ मतदारसंघांपैकी राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचा मानला जातो.कोरेगाव आणि सातारा,खटाव तालुक्यातील काही गावांचा या विधानसभा मतदारसंघात समावेश आहे.
2009 मध्ये विधानसभा पुनर्रचना झाल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे या मतदारसंघातून विजयी झाले. 2014 ला देखील त्यांनी विजय मिळवला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे महेश शिंदे विजयी झाले. येत्या विधानसभा निवडणुकीत देखील शशिकांत शिंदे विरुद्ध महेश शिंदे अशी लढत होईल.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महेश शिंदे विजयी झाले. त्यानंतर काही महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं शशिकांत शिंदे यांना विधानपरिषदेवर घेतलं. त्यामुळं आता होणारी विधानसभा निवडणूक दोन्ही आमदारांमध्ये होणार आहे. आमदार महेश शिंदे हे जून 2022 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावेळी त्यांच्यासोबत होते. दुसरीकडे शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवेळी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला.आता दोन्ही आमदार पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणात उतरलेले पाहायला मिळतील.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शशिकांत शिंदे दोनवेळा आमदार राहिले आहेत. महेश शिंदे यांची आमदार म्हणून एक टर्म पूर्ण झाली आहे. आता दोन्ही नेते पुन्हा एकदा कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या मतदारांसमोर जाणार आहेत. दोन्ही नेत्यांना कोरेगाव मतदारसंघात मोठा जनाधार असल्यानं 2019 ची विधानसभा निवडणूक अटीतटीची झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली होती. उदयनराजे भोसले यांना 103922 मतं मिळाली होती. तर, शशिकांत शिंदे यांना 97087 मतं मिळाली. त्यामुळं येत्या विधानसभा निवडणुकीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदार कोणत्या शिंदेंना आमदार म्हणून विधानसभेत पाठवणार हे पाहावं लागेल.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून महेश शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्यानं उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली नाहीत. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे.