
नवी दिल्ली वृत्तसंस्था
असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच एडीआरने भारतातील सर्वात श्रीमंत आमदारांचा ताजा अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार, देशातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीत दक्षिणेकडील राज्यांचे वर्चस्व आहे, ज्यामध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील नेते आघाडीवर आहेत.
देशातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात गरीब दोन्ही आमदार भाजपकडे आहेत. एडीआरच्या अहवालात म्हटले आहे की, आमदारांमध्ये आर्थिक असमानता खूप जास्त आहे. सर्वात श्रीमंत आणि सर्वात कमी श्रीमंत आमदारांमध्ये 3,382 कोटी रुपयांपेक्षा जास्त फरक आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या अहवालानुसार, महाराष्ट्रातल्या घाटकोपर पूर्वचे भाजप आमदार पराग शाह हे देशातील सगळ्यात श्रीमंत आमदार आहेत. पराग शाह यांची संपत्ती तब्बल 3,383 कोटी रुपये एवढी आहे. तर पश्चिम बंगालच्या इंडस येथील भाजपचे निर्मल कुमार धारा यांची घोषित मालमत्ता सर्वात कमी म्हणजे फक्त 1,700 रुपये आहे. निवडणूक लढवण्यापूर्वी प्रत्येक नेता प्रतिज्ञापत्रावर आपली मालमत्ता जाहीर करतो. हा ADR अहवाल त्यावर आधारित आहे. अहवालात, एडीआरने 28 राज्य विधानसभा आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमधील 4,092 आमदारांचे विश्लेषण केले आहे.
सर्वात श्रीमंत 10 आमदार कोण आहेत?
1. पराग शहा (भाजप, महाराष्ट्र) – 3,383 कोटी
2. डी.के. शिवकुमार (काँग्रेस, कर्नाटक) – 1413 कोटी रुपये
3. के.एच. पुट्टास्वामी गौडा (स्वतंत्र, कर्नाटक) – 1267 कोटी
4. प्रियकृष्ण (काँग्रेस, कर्नाटक) – 1156 कोटी
5. एन. चंद्राबाबू नायडू (टीडीपी, आंध्र प्रदेश) – 931 कोटी रुपये
6. पोंगुरु नारायण (टीडीपी, आंध्र प्रदेश) – 824 कोटी रुपये
7. वाय.एस. जगन मोहन रेड्डी (वायएसआरसीपी, आंध्र प्रदेश) – 757 कोटी रुपये
8. व्ही. प्रशांती रेड्डी (टीडीपी, आंध्र प्रदेश) – 716 कोटी रुपये
9. जयंतीभाई सोमाभाई पटेल (भाजप, गुजरात) – 661 कोटी रुपये
10. सुरेश बी.एस. (काँग्रेस, कर्नाटक) – 648 कोटी
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या अहवालानुसार, आंध्र प्रदेश सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीत अव्वल आहे. भारतातील पहिल्या 10 श्रीमंत आमदारांमध्ये आंध्र प्रदेशच्या चार आमदारांचा समावेश आहे आणि पहिल्या 20 मध्ये सात आमदारांचा समावेश आहे.