विटा : प्रदीप जोशी
विटा : स्वच्छतेचा ध्यास, नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यांच्या जोरावर विटा शहराने देशपातळीवर मोठी कामगिरी केली आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये २५ ते ५० हजार लोकसंख्या गटात विटा शहराने स्वच्छतेच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विटा शहराचा गौरव करण्यात आला. त्यामुळे विटा शहरासह संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली विटा नगरपरिषदेने ही उल्लेखनीय कामगिरी केली. नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सर्व सभापती, नगरसेवक, मुख्याधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि स्वच्छतादूत यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे विट्याला हा राष्ट्रीय बहुमान मिळाला. राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात नगराध्यक्षा काजल म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोल बाबर, आरोग्य सभापती भालचंद्र कांबळे आणि मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी शहराच्या वतीने हा सन्मान स्वीकारला.
विटा नगरपरिषदेने स्वच्छतेकडे केवळ दैनंदिन काम म्हणून न पाहता शहराचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांचे आरोग्य यांच्याशी जोडले आहे. स्वच्छतेचे नियोजन, त्याची प्रभावी अंमलबजावणी, नियमित देखरेख आणि लोकसहभाग या बाबींवर विशेष भर देण्यात आला. याच नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे विटा शहराला राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण करता आली.
शहरातील प्रत्येक घरातून दररोज ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे गोळा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. घराघरांतून कचरा संकलित करण्यापासून त्याचे वर्गीकरण, वाहतूक आणि शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यापर्यंतची यंत्रणा प्रभावीपणे राबवली जात आहे. शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, व्यापारी पेठा, बाजारपेठा, निवासी परिसर आणि सार्वजनिक ठिकाणांची नियमित स्वच्छता केली जाते. गटारांची साफसफाई तसेच सार्वजनिक शौचालयांची देखभाल आणि स्वच्छतेवरही सातत्याने लक्ष दिले जाते.
प्लास्टिकमुक्त शहर निर्माण करण्यासाठी नगरपरिषदेकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. पुनर्वापर करता येणाऱ्या कचऱ्याचे स्वतंत्र वर्गीकरण केले जाते. कचरा कमी करणे, वस्तूंचा पुनर्वापर आणि पुनर्चक्रण या 3R संकल्पनेचा अवलंब करून कचऱ्याचे प्रमाण घटविण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य दिले जात आहे.
शहरातील तलाव, ओढे आणि इतर जलस्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष स्वच्छता मोहिमा राबवल्या जातात. सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण, परिसराचे सौंदर्यीकरण, वृक्षारोपण, हरित क्षेत्रांची निर्मिती आणि प्रदूषण नियंत्रण अशा विविध उपक्रमांतून विटा शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हा विचार नागरिकांमध्ये रुजविण्यासाठी जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शाळा, महाविद्यालये, व्यापारी संघटना, सामाजिक संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांना या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या कामाला केवळ प्रशासकीय उपक्रम न ठेवता लोकचळवळीचे स्वरूप देण्यात नगरपरिषदेला यश आले आहे.
विटा शहराला मिळालेला हा पुरस्कार केवळ नगरपरिषदेचा सन्मान नसून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कष्टांची पोचपावती आहे. पहाटेपासून रस्ते, गटारे आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करणारे सफाई कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, पर्यवेक्षक, वाहनचालक, अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून हे यश साकारले आहे. याशिवाय लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, व्यापारी आणि जागरूक नागरिकांनी दिलेल्या सहकार्याचाही या कामगिरीत मोलाचा वाटा आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये देशात प्रथम क्रमांक आणि राष्ट्रपती भवनात झालेला सन्मान यामुळे विटा शहराच्या विकासाला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. सातत्यपूर्ण स्वच्छता, गुणवत्तापूर्ण कामकाज, आधुनिक कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांचा सहभाग यांची सांगड घातल्यास लहान शहरही देशपातळीवर आपला ठसा उमटवू शकते, हे विटा शहराने आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे.


