विटा : प्रदीप जोशी
सांगली : विटे शहरात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिकेने पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे. पिण्याच्या पाण्याचा वापर रस्ते, गटारी आणि वाहने धुण्यासाठी केल्यास दंडात्मक कारवाईसह कोणतीही पूर्वसूचना न देता संबंधितांची नळजोडणी खंडित करण्यात येईल, असा इशारा पालिकेने प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिला आहे.
राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. कृष्णा नदीची जलपातळी घटली असून, घोगाव जॅकवेल येथील नदीपात्रातील पाणीसाठाही कमी झाला आहे. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून पुरवण्यात येणारे पाणी केवळ पिण्यासाठी वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही पालिकेने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाणी सोडल्यानंतर शेवटच्या नळजोडणीपर्यंत पाणी वाया जात नाही ना, तसेच कुठे गळती आहे का, याची खातरजमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गळती आढळल्यास नागरिकांच्या तक्रारीची वाट न पाहता पाणीपुरवठा विभागाला कळवून तातडीने दुरुस्ती करावी, असे सांगण्यात आले आहे.
पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होणार नाहीत, याची दक्षता घेण्यासह टाकीखालील व्हॉल्व्ह किंवा अन्य ठिकाणी गळती आढळल्यास तातडीने विभागाला कळवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाणीटंचाई ही नैसर्गिक आपत्ती असल्याने कर्मचाऱ्यांनी कामात चालढकल किंवा बेजबाबदारपणा करू नये; अन्यथा संबंधितांना जबाबदार धरले जाईल, असा इशाराही पालिकेने दिला आहे.


