भिलवडी/सांगली प्रतिनिधी
भिलवडी : कोयना धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी भिलवडी येथे सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन केले. चार दिवसांत कृष्णा नदी प्रवाही झाली नाही, तर शेतकऱ्यांसह कोयना धरणाचे दरवाजे उघडू, असा इशारा त्यांनी दिला.
यंदा कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले असताना ऑक्टोबरमध्येच कृष्णा नदी कोरडी पडल्याबद्दल शेट्टी यांनी मुख्यमंत्री आणि जलसंपदा विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. नदीचे पाणी रोखून ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांनी घाबरून कमी दरात कारखान्यांना ऊस घालावा, यासाठी हे षड्यंत्र सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.
सध्या कोयना धरणात ८९ टीएमसी पाणीसाठा असूनही जलसंपदा विभागाकडे पाणी वापराचे योग्य नियोजन नसल्याची टीका शेट्टी यांनी केली. कालवा समितीची बैठक होत नसल्याने पाण्याच्या नियोजनाचा प्रश्न निर्माण झाल्याचे ते म्हणाले. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना पाण्याच्या प्रश्नावर बैठक घेण्यासाठी वेळ नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘साखरेची एमएसपी ठरवा, उसाचा दर जाहीर करा’, अशी मागणी करत शेट्टी यांनी साखर कारखाने सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांना योग्य दर निश्चित करून देण्याची भूमिका मांडली. शेतकऱ्यांनी घाई न करता संयम बाळगावा. आठवडाभरात ऊस वाळणार नाही, उलट वजनात वाढ होऊ शकते. चांगला दर मिळवण्यासाठी संघटनेच्या आंदोलनाला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. पाण्याची टंचाई असल्यास रब्बी पिकांचा पर्याय स्वीकारण्याचे आवाहनही त्यांनी केले.
वीज निर्मितीसाठी वापरलेले धरणातील सुमारे ६० टीएमसी पाणी समुद्रात जात असल्याचे सांगत, हे पाणी शेती आणि पिण्यासाठी वापरण्याचा पर्याय असल्याचे शेट्टी म्हणाले. कृष्णा नदी प्रवाही झाल्यानंतर महावितरणने भारनियमन केल्यास कायदा हातात घेऊ आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या खुर्च्या जागेवर ठेवणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनावेळी संघटनेचे संदीप राजोबा यांनी भाषण केले. प्रतीक पाटील, विजय चोपडे, शहाजी गुरव, रमेश पाटील, सुरेंद्र वाळवेकर, बाळासाहेब शिंदे, संभाजी सूर्यवंशी, चंद्रकांत पाटील, सनी यादव यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.


