नागपूर प्रतिनिधी
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बंडखोरी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नितेश कराळे मास्तर यांच्यावर पक्षाने मोठी कारवाई केली आहे. पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कराळे यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मतदानाच्या अवघ्या काही तास आधी ही कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, पक्षाच्या निर्णयानंतर नितेश कराळे यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडताना भावनांना वाट मोकळी करून दिली.
बंडखोरी आणि पक्षविरोधी भूमिकेमुळे कारवाई
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा ठपका नितेश कराळे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच, निवडणुकीत आपल्याला शरद पवार यांचा आशीर्वाद असल्याचा संभ्रम निर्माण केल्याचा आरोपही पक्षाने केला आहे.
या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने कराळे यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांच्या स्वाक्षरीचे कारवाईसंदर्भातील पत्रही समोर आले आहे.
दरम्यान, काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अभिजीत वंजारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या भूमिकेला विरोध करून स्वतंत्र उमेदवारी कायम ठेवणाऱ्या कराळे यांच्याविरोधात पक्षाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘मला पक्षात घेतलंच कशाला?’ कराळे यांचा सवाल
पक्षाच्या कारवाईनंतर नितेश कराळे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. पक्षाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत त्यांनी पक्षातील अंतर्गत घडामोडींवरही भाष्य केले.
“हो, कारवाई झाली असेल. मी एक सर्वसामान्य व्यक्ती आहे. अनेकदा पक्षाच्या विरोधात बोललं की अशा प्रकारे तिकीट कापलं जातं. एकमेकांचे कान भरवले जातात. माझी हकालपट्टीच करायची होती, तर मला पक्षात घेतलंच कशाला?” असा सवाल कराळे यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना त्यांनी जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या भेटीचा संदर्भ दिला. “जयंत पाटलांनी माझं मनगट धरून मला शरद पवारांसमोर नेलं होतं. त्यावेळी आपल्या पक्षात लोकशाही आहे, असं काही करणार नाही, असं मला सांगितलं होतं. मात्र, आता अचानक अशा प्रकारची कारवाई करण्यात आली. त्या कारवाईचा मी स्वीकार करतो,” असे कराळे म्हणाले.
‘पक्षासाठी एवढं काम केलं, हाच हकालपट्टीचा पुरस्कार’
पक्षाने केलेल्या कारवाईमुळे व्यथित झालेल्या कराळे यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा आरोपही केला. पक्षासाठी काम करूनही आपल्याला अपेक्षित साथ मिळाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
“माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले, मला जेलमध्ये टाकलं, तेव्हा पक्षातील एका नेत्यानेही माझ्या घरी फोन केला नाही. आतापर्यंत या भावना मी लोकांना सांगितल्या नाहीत. हे लोक जर मला अशी वागणूक देत असतील, तर मी कोणाला सांगायचं?” असा सवाल त्यांनी केला.
“माणसात माणूस रडू शकत नाही का? शेवटी अशा भावना कुठे व्यक्त करायच्या? मी पक्षासाठी एवढं काम केलं आणि पक्षाने मला हा हकालपट्टीचा पुरस्कार दिला,” असे म्हणताना कराळे यांना अश्रू अनावर झाले. माध्यमांसमोरच ते ढसाढसा रडले.
निवडणुकीनंतर पुढील भूमिका जाहीर करणार
नितेश कराळे यांनी निवडणूक पार पडल्यानंतर आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. या निवडणुकीत आपला विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांपासून कराळे यांनी महाविकास आघाडीच्या भूमिकेच्या विरोधात प्रचार केल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत पक्षाने अखेर हकालपट्टीचा निर्णय घेतला.
मतदानाच्या तोंडावर झालेली ही कारवाई, कराळे यांची भावनिक प्रतिक्रिया आणि निवडणुकीनंतर ते कोणती राजकीय भूमिका घेतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


