नागपूर प्रतिनिधी
नागपूर : सामायिक शेतजमिनीच्या हिश्शांवरून कुटुंबात आणि जमीन विक्रीच्या वेळी निर्माण होणारे वाद टाळण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सामायिक जमिनीची मोजणी करून प्रत्येकाचा हिस्सा निश्चित केल्याशिवाय जमिनीची नोंदणी करता येणार नाही, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दिली.
यापूर्वी सातबारा उताऱ्यावर चार जणांची नावे असली, तरी त्यापैकी एखादी व्यक्ती जमीन विकू शकत होती. मात्र, प्रत्यक्ष जमिनीवर गेल्यानंतर कोणाच्या वाट्याला कोणता भाग येणार, यावरून वाद निर्माण होत होते. अशा प्रकरणांमध्ये न्यायालयीन लढाई वर्षानुवर्षे सुरू राहण्याची शक्यता असते. हे वाद टाळण्यासाठी सामायिक जमिनीची मोजणी करून प्रत्येकाचा हिस्सा निश्चित करणे आवश्यक असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
जरांगे यांच्या आरोपांची तक्रार आल्यास चौकशी
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत एक ऑडिओ क्लिप ऐकवली. या क्लिपमध्ये शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जरांगे यांना ५०० कोटी रुपये पोहोचवल्याचा उल्लेख असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच भाजपकडून षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोपही केला.
यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, संबंधित व्यक्तीने सरकारकडे रीतसर तक्रार केल्यास तिची चौकशी करण्यात येईल. तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे किंवा संबंधित यंत्रणेकडे आली असल्यास त्यानुसार कार्यवाही केली जाईल. तक्रार कोणत्या पोलीस ठाण्यात किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झाली आहे, हे स्पष्ट झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.
राज ठाकरे यांच्या विधानावर टोला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विधानाबाबत विचारले असता बावनकुळे यांनी, “दिवाळी आली की फटाके फुटतात. त्यामुळे दिवाळीचा एक फटाका फुटला,” अशी मिश्किल टिप्पणी केली.
‘फ्रेंडशिप फाईल्स’ या माहितीपटाच्या संदर्भात बोलताना त्यांनी व्यवसाय आणि उद्योग क्षेत्र देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले. व्यावसायिकांसोबत बैठका घेणे किंवा त्यांच्या अडचणी समजून घेणे म्हणजे त्यांना अनुचित मदत करणे नव्हे, असे ते म्हणाले. अदानी आणि अंबानी यांच्याशी संबंध असल्याचे दाखवण्यासाठी अशा प्रकारच्या फाईल्स तयार करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
काँग्रेसने ६५ वर्षे देशात सत्ता उपभोगली असून, आता केंद्रातील सत्तेपासून दूर असल्याने नकारात्मकता पसरवून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. देशातील जनता विकासाच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


