नागपूर प्रतिनिधी
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या दीक्षाभूमीच्या विकासासाठी ९९१ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हा विकास प्रकल्प चार टप्प्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असून, प्रस्तावित निधीला राज्य सरकारने लवकर मंजुरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने मंगळवारी दीक्षाभूमी येथे आयोजित ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात हा मुद्दा मांडण्यात आला.
दीक्षाभूमीच्या विकासासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेबाबत अधिवक्ता शैलेश नारनवरे यांनी माहिती दिली. चार टप्प्यांत राबविण्यात येणाऱ्या ९९१ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकर मंजुरी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. म्यानमारचे भदंत वन्ना सिरी महाथेरो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म प्रचारक डॉ. टी. धम्म रतन यांनी जगाला शांतता आणि सद्भावनेचा मार्ग दाखविण्यासाठी तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांची आज अधिक गरज असल्याचे सांगितले. आर्थिक संकटे आणि जागतिक आव्हानांचा सामना करणाऱ्या जगासाठी बुद्धांचे विचार मार्गदर्शक ठरू शकतात, असे त्यांनी नमूद केले.
फ्रान्समधील प्राकुंट बुद्धिस्ट अकादमीचे अध्यक्ष आणि इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ युनायटेड नेशन्स डे ऑफ वैशाखचे उपाध्यक्ष असलेल्या डॉ. धम्म रतन यांनी बौद्ध धम्माचा प्रसार आता केवळ आशिया खंडापुरता मर्यादित राहिला नसल्याचे सांगितले. जगभरात बौद्ध धम्माला स्वीकारार्हता मिळत असून, बुद्धांच्या शिकवणीतून शांतता, सहअस्तित्व आणि सद्भावनेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दीक्षाभूमी ही स्वातंत्र्य, विजय आणि मानवी न्यायाची भूमी असल्याचेही त्यांनी सांगितले.
दिल्लीचे भंते करुणाकरण यांनी महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी केली. तसेच बौद्ध समाजासाठी स्वतंत्र व्यक्तिगत कायदा असावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. स्वतंत्र कायदा झाल्यास महाबोधी विहाराच्या मुक्ततेसाठी सुरू असलेल्या मागणीला बळ मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कर्नाटकचे जेसे ठाकपा जिंगपा यांनी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे प्रत्यक्ष आचरण करणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असे सांगितले. बौद्ध धम्म हा कोणत्याही एका देशापुरता मर्यादित नसून संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सोहळ्यात देश-विदेशातून आलेल्या बौद्ध भिक्खू आणि अनुयायांनी बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. बेंगळुरूचे जिग्मे सुल्ट्रीम महाथेरो, सारनाथचे डी. रेवतथेरो, अधिवक्ता आनंद फुलझेले आणि समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.


