स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कारवाई करत १४ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) जप्त केले आहे. या अमली पदार्थाची किंमत अंदाजे २ लाख १० हजार रुपये आहे. या प्रकरणी कलीम शमीम शेख (३२), निलोफर सँडोले (५०) आणि फिरोज शेख उर्फ फिरोज चिकना (६१) या तिघांना अटक करण्यात आली आहे.
१६ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ३.१५ च्या सुमारास वांद्रे पश्चिम येथील कुरेशी नगर मैदान, एस. व्ही. रोड परिसरात गुन्हे प्रकटीकरण पथक गस्त घालत होते. यावेळी कलीम शमीम शेख याच्याकडे १४ ग्रॅम एमडी आढळून आले. पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून हा अमली पदार्थ जप्त केला. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२०२/२०२६ नोंदवण्यात आला असून, अमली पदार्थ विरोधी कायदा १९८९ मधील कलम ८(क), २२(ब) आणि २९ नुसार कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी कलीम शेख याच्याकडे चौकशी केली असता, निलोफर सँडोले आणि फिरोज शेख उर्फ फिरोज चिकना यांच्यासोबत संगनमत करून अमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन त्यांनाही याच गुन्ह्यात अटक केली.
अपर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त डॉ. मोहित कुमार गर्ग आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अधिकराव पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र साळुंखे, पोलीस निरीक्षक अजय लिंगनूरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र नांगरे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र नांगरे करीत आहेत.


