वडगाव प्रतिनिधी
वडगाव मावळ : परदेशातील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी बेकायदा कॉल सेंटर चालविणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला. मावळ तालुक्यातील नांगरगाव येथील ओमेगा सोसायटीमधील ‘देव व्हिला’ या बंगल्यावर छापा टाकून पोलिसांनी २० जणांना अटक केली. या कारवाईत मोबाईल फोन, लॅपटॉप, रोख रक्कम आणि चारचाकी वाहनांसह एकूण ३६ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नांगरगाव परिसरातील एका बंगल्यात काही व्यक्ती एकत्र येऊन बेकायदा कॉल सेंटर चालवत असल्याची गोपनीय माहिती लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश विधाते यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा शहर पोलिसांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. पंचांसमक्ष बंगल्यात प्रवेश केला असता, काही व्यक्ती हेडफोन लावून लॅपटॉप आणि मोबाईलच्या माध्यमातून इंग्रजीत संभाषण व संदेशांची देवाणघेवाण करत असल्याचे आढळले. शेजारील खोलीतही अशाच प्रकारचे काम सुरू होते. चौकशीमध्ये कॉल सेंटर चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या अधिकृत परवानग्यांची समाधानकारक कागदपत्रे संबंधितांकडे मिळाली नाहीत.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या कॉल सेंटरमधून इंटरनेट कॉलद्वारे अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांतील नागरिकांशी संपर्क साधला जात होता. अॅमेझॉन आणि गुगल यांसारख्या नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून नागरिकांना विविध योजनांची आमिषे दाखविली जात होती. त्यानंतर विश्वास संपादन करून संबंधितांच्या बँक खात्यांची माहिती, क्रेडिट कार्ड आणि एटीएम कार्डचे तपशील मिळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. या माहितीच्या आधारे बनावट बँकसंबंधित कागदपत्रे तयार केली जात असल्याचाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
काही नागरिकांना त्यांच्या नावाने मागविलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ आढळल्याचे सांगून घाबरविले जात होते. या माध्यमातून मानसिक दबाव निर्माण करून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकारामागील आर्थिक व्यवहार, फसवणुकीची कार्यपद्धती आणि इतर संभाव्य बाबींचा तपास करण्यासाठी जप्त केलेले मोबाईल फोन आणि लॅपटॉप पोलिसांकडून तपासले जात आहेत.
या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि इंडियन टेलिग्राफ कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, ते पोलीस कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश विधाते यांच्यासह दोन्ही पथकांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.


