हिंगोली/नवी दिल्ली वृत्तसंस्था
दिल्लीत आंदोलन करणाऱ्या सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस (सीजेपी) या संघटनेचे आशुतोष रांका, अजिक्य शिंदे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे आंदोलनाच्या पुढील दिशेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके हे आजीच्या अंत्यसंस्कारासाठी हिंगोली जिल्ह्यातील आपल्या गावी आले असताना सहकाऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच त्यांनी हालचाली सुरू केल्या. कुंडकर पिंपरी शिवारातील एका शेतात पोहोचल्यानंतर तेथून कच्च्या रस्त्याने जंगल परिसरात जात त्यांनी आंदोलनाच्या पुढील रणनीतीबाबत सहकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती आहे.
अभिजीत दीपके हे गेल्या दोन दिवसांपासून आजीच्या अंत्यसंस्कारासाठी गावी आले होते. घरात अंत्यसंस्कारानंतरचे धार्मिक विधी आणि इतर कार्यक्रम सुरू असतानाच दिल्लीत आंदोलन करणाऱ्या सहकाऱ्यांना पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी त्यांनी सहकाऱ्यांशी संपर्क साधला. गावातून बाहेर पडताना त्यांनी कच्च्या रस्त्याचा मार्ग निवडत इनोव्हा कारमधून जंगल परिसर गाठल्याचे सांगण्यात येत आहे. तेथून त्यांनी आंदोलनासंदर्भात महत्त्वाच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे.
जाफराबाद पोलीस ठाण्यात ठेवल्याचा दावा
दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांच्या मदतीसाठी वकील पाठवण्यात आल्याची माहिती अभिजीत दीपके यांनी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे १४ ते १५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांना जाफराबाद पोलीस ठाण्यात ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सीजेपीच्या लीगल हेड रत्ना आणि मेहर यांच्याशी आपले बोलणे झाले असून, कायदेशीर मदतीसाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
मात्र, ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांशी अद्याप थेट संपर्क होऊ शकलेला नाही. वकिलांनाही आंदोलकांशी संवाद साधू दिला जात नसल्याचा आरोप दीपके यांनी केला आहे. आंदोलकांना नेमक्या कोणत्या कारणासाठी ताब्यात घेण्यात आले, याबाबत दिल्ली पोलिसांकडून अधिकृत स्पष्टीकरण मिळालेले नसल्याचेही त्यांनी नमूद केले. परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी आपण दुसऱ्या दिवशी दिल्लीला जाणार असल्याचे दीपके यांनी सांगितले.
तिरंगा घेऊन आंदोलन करणाऱ्यांनाही रोखणार का?
सीजेपीचे कार्यकर्ते तिरंगा हातात घेऊन जंतरमंतर येथे आंदोलनासाठी गेले होते. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याच्या कारवाईवर दीपके यांनी नाराजी व्यक्त केली. तिरंगा घेऊन आंदोलन करणाऱ्यांवरही कारवाई होत असेल, तर तिरंग्यावरही बंदी आणणार का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली.
दरम्यान, दिल्लीत आंदोलनस्थळांवरील निर्बंध आणि आंदोलकांना ताब्यात घेण्याच्या कारवाईमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. एका बाजूला दिल्लीतील सहकाऱ्यांना कायदेशीर मदत मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसऱ्या बाजूला आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी दीपके यांनी संपर्क वाढवला आहे. ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांची नेमकी संख्या, त्यांच्यावरील कारवाईचे कारण आणि त्यांची सद्यस्थिती याबाबत अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच या प्रकरणाचे चित्र स्पष्ट होणार आहे.


