नवी दिल्ली वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनाची हाक देणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके आणि पक्षाचे नेते सौरव दास व आशुतोष रांका यांना अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर सुटका मिळाली. शनिवारी दिल्ली पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले होते. रविवारी त्यांना कार्यकारी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत न्यायालयाने तिघांच्या सुटकेचे आदेश दिल्याने दिल्ली पोलिसांना धक्का बसल्याचे मानले जात आहे.
Executive Magistrate court releases Abhijeet, Saurav and Ashutosh.
— Ratna Singh (@whattalawyer) October 11, 2026
‘नेमकं काय केलं होतं?’ न्यायालयाचा पोलिसांना सवाल
सीजेपीच्या नेत्यांना ताब्यात घेण्यामागे नेमके कारण काय, त्यांनी कोणते कृत्य केले होते आणि त्यांना विमानतळावरच ताब्यात घेण्याची आवश्यकता का भासली, असे सवाल सुनावणीदरम्यान उपस्थित करण्यात आल्याची माहिती आहे. अभिजीत दीपके यांच्या वकिलांनी न्यायालयात बाजू मांडताना, दीपके हे आंदोलनस्थळी गेले नव्हते आणि त्यांनी प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघनही केले नव्हते, असा युक्तिवाद केला. त्यामुळे त्यांच्याविरोधात करण्यात आलेल्या कारवाईच्या औचित्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
बेल बाँडच्या अटीवर सुटकेचे आदेश
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीने दिल्लीतील जंतरमंतर परिसरात आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. त्यानंतर दिल्लीत दाखल झालेल्या अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रविवारी त्यांना कार्यकारी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. सुनावणीनंतर तिघांची सुटका करण्याचे आदेश देण्यात आले. पोलिसांकडून त्यांच्याकडून बेल बाँड तयार करून घेण्याची भूमिका मांडण्यात आल्याचेही समजते.
एक वर्ष शांतता राखण्याची अट?
प्राथमिक माहितीनुसार, पुढील एक वर्ष शांतता भंग न करण्याच्या अटीवर सीजेपीच्या नेत्यांची सुटका करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. जंतरमंतर परिसरात जाऊ न देण्याची भूमिका दिल्ली पोलिसांनी मांडली होती. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नेमक्या कोणत्या अटी घालण्यात आल्या, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
दरम्यान, सुटकेनंतर अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका आंदोलनाबाबत कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सुरू झालेला संघर्ष आता पोलिसांची कारवाई, न्यायालयीन हस्तक्षेप आणि आंदोलनाच्या पुढील रणनीतीमुळे अधिक चर्चेत आला आहे.


