रणजित मस्के, गुन्हे वार्ताहर
वाशिम-मालेगाव मार्गावरील सावरगाव बर्डे गावाजवळ ट्रकचालकाला अडवून चाकूचा धाक दाखवत मारहाण करून लूट करणाऱ्या टोळीचा वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने तपास लावला आहे. या प्रकरणातील दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून लुटीतील १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील लाखाखेडी येथील ट्रकचालक रुपसिंग नारायणसिंग राजपूत (वय ३५) हे २९ जुलै २०२४ रोजी रात्री माल घेऊन वाशिम-मालेगाव मार्गाने जात होते. सावरगाव बर्डे गावाजवळ ३ ते ४ अज्ञात व्यक्तींनी त्यांचा ट्रक अडवला. त्यानंतर चालक आणि क्लीनरला मारहाण करून चाकूचा धाक दाखवण्यात आला. आरोपींनी ५ हजार रुपयांची रोकड आणि १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण २० हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन पोबारा केला. याप्रकरणी वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे अजय हरिभाऊ चव्हाण (वय २२, रा. तिरुपती सिटीच्या मागे, वाशिम) आणि आशिष नारायण चव्हाण (वय २७, रा. नालंदा नगर, लेडी हार्डिंगजवळ, वाशिम) यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत दोन्ही आरोपींनी इतर साथीदारांच्या मदतीने हा दरोडा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर आडे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे तसेच पोलीस कर्मचारी गजानन झगरे, आशिष बिडवे, ज्ञानदेव मात्रे, गजानन गोटे, अमोल इरतकर, दीपक घुगे आणि आकाश पाईकराव यांच्या पथकाने केली.

