सुधाकर नाडर, मुंबई
ठाणे : कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्याचा तपास करताना वागळे गुन्हे शाखा, घटक क्रमांक ५च्या पथकाने अवघ्या २४ तासांत दोन संशयितांना नागपूर येथून ताब्यात घेतले. गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी अमोल दिलीप वाघमारे (वय ४९, रिक्षाचालक, रा. अजनी, नागपूर) आणि कृपाल किशोर भैसारे (वय ३१, रा. ज्योती नगर, लष्करीबाग, पाचपावली, नागपूर) हे पाचपावली परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर वागळे गुन्हे शाखेच्या पथकाला नागपूरला रवाना करण्यात आले. तांत्रिक पद्धतीने शोध घेत दोघांनाही २३ सप्टेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या चौकशीत अमोल वाघमारे याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याचे सांगून सहआरोपी कृपाल भैसारे याच्या मदतीने चाकूने गळा चिरून पत्नीचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यानंतर दोघेही घटनास्थळावरून पसार झाल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या कारवाईमुळे खुनाच्या गुन्ह्याची २४ तासांच्या आत उकल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई सह पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले आणि पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त शोध-१ गुन्हे शेखर बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घार्गे, सहायक पोलीस निरीक्षक शरद पाटील तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने केली.


