मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात माऊंट मेरी जत्रेदरम्यान नशेत असल्याचा आरोप असलेल्या २८ वर्षीय महिलेने गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावरच महिलेने हल्ला केल्याचा आरोप असून, तिने पोलीस शिपाई यशोदा चौगुले यांच्या डाव्या हाताला चावा घेतल्याचे समोर आले आहे. या घटनेत चौगुले जखमी झाल्या असून, वांद्रे पोलिसांनी निकी क्रिस जसिंग्टो हिला अटक केली आहे.
ही घटना २० सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९.१० वाजण्याच्या सुमारास वांद्रे पश्चिम येथील चॅपल रोडवरील कार्मेल चर्चसमोर घडली. एका महिलेचा रस्त्यावर गोंधळ सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर वांद्रे पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संबंधित महिला नशेत असल्याचे दिसून आले. तिला शांत राहण्यास सांगून तेथून जाण्याची विनंती करण्यात आली; मात्र तिने पोलिसांशी वाद घातल्याचा आरोप आहे.
महिलेने पोलीस वाहनात जाण्यास नकार दिल्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी निकीने पोलीस शिपाई यशोदा चौगुले यांना मागून पकडून त्यांच्या डाव्या हाताला चावा घेतल्याचा आरोप आहे. या घटनेत चौगुले यांच्या हाताला दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली.
पोलिसांच्या तक्रारीनुसार, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, पोलिसांशी शिवीगाळ करणे आणि शासकीय कामात अडथळा आणणे तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. निकी जसिंग्टो हिला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने तिला कोठडीत पाठविल्याचे वृत्त आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वांद्रे पोलीस करीत आहेत.

