परभणी : प्रतिनिधी
परभणी : परभणी तालुक्यातील उमरी परिसरात अवैध गौण खनिज मुरूमाची वाहतूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि. २१) दोन स्वतंत्र कारवाया केल्या. या कारवाईत दोन हायवा टिप्पर ताब्यात घेण्यात आले असून, एकूण ७० लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्यात अवैध गौण खनिजाच्या वाहतुकीविरोधात पोलीस प्रशासनाकडून मोहीम सुरू आहे. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने उमरी परिसरात कारवाई केली.
उमरी–परभणी रस्त्यावर अवैध मुरूम वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत टाटा कंपनीचा एमएच ४६ एआर ९५०० क्रमांकाचा टिप्पर ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलीस अंमलदार नामदेव धोत्रे यांच्या फिर्यादीवरून हायवा मालक आणि सय्यद फिरोज सय्यद शब्बीर (रा. बोरवंड खुर्द, ता. परभणी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दुसऱ्या कारवाईत उमरी येथील मातोश्री किराणा दुकान परिसरातून एमएच २४ एयू ८५०० क्रमांकाचा हायवा ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी पोलीस अंमलदार शरद सावंत यांच्या फिर्यादीवरून हायवा मालक आणि शेख रहिम शेख साहेबलाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही कारवायांमध्ये मिळून ७० लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक जायभाये, उपनिरीक्षक चंदनशिव परीहार यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा सहभाग होता.

