नवी दिल्ली वृत्तसंस्था
नोएडातील बहुचर्चित आणि देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या निठारी हत्याकांडातील आरोपी सुरेंद्र कोली याचा हरिद्वारमध्ये संशयास्पदरीत्या मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, कोलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हरिद्वारमधील भूपतवाला परिसरातील सप्त सरोवर रोडवर लालमाता मंदिरासमोरील एका चहाच्या दुकानात त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेने निठारी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र कोली गेल्या काही दिवसांपासून भूपतवाला परिसरात चहाचे दुकान चालवत होता. शुक्रवारी त्याचा मृतदेह दुकानात दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच सप्तऋषी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. कोली हा उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील भिकियासैण भागातील मंगरुखाल गावचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्याच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.
निठारी प्रकरणाने देश हादरला
२९ डिसेंबर २००६ रोजी नोएडातील निठारी परिसरात मोनिंदर सिंग पंढेर याच्या घरामागील नाल्यात लहान मुलांचे सांगाडे आणि मानवी अवशेष आढळून आल्याने देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पंढेर आणि त्याचा नोकर सुरेंद्र कोली यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. एकूण १९ प्रकरणांमध्ये त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते.
या प्रकरणात सत्र न्यायालयाने सुरेंद्र कोलीला १३ प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे निठारी हत्याकांडातील कोलीचे नाव देशभर चर्चेत आले. मात्र, पुढील न्यायालयीन प्रक्रियेत या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.
पुरावे अपुरे; उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
ऑक्टोबर २०२३ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने पुरावे अपुरे असल्याचे नमूद करत सुरेंद्र कोलीला १२ प्रकरणांमध्ये निर्दोष मुक्त केले. त्यानंतर या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयातही आव्हान देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप न करता कोलीच्या निर्दोष मुक्ततेचा मार्ग मोकळा केला. न्यायालयीन प्रक्रियेनंतर निठारी प्रकरणातील त्याच्याविरुद्धची प्रकरणे संपुष्टात आली.
सर्व प्रकरणांतून सुटका झाल्यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये सुरेंद्र कोली तुरुंगातून बाहेर आला होता. तुरुंगातून सुटल्यानंतर तो उत्तराखंडमध्ये परतला आणि हरिद्वारमध्ये चहाचे दुकान चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आता त्याच दुकानात त्याचा मृतदेह आढळल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
‘सेक्टर ३६’मुळे पुन्हा चर्चेत आले होते प्रकरण
निठारी हत्याकांडाने समाजमन हादरवून सोडले होते. या घटनेवर आधारित ‘सेक्टर ३६’ हा चित्रपटही काही वर्षांपूर्वी ओटीटीवर प्रदर्शित झाला. निठारी परिसरातील घटनांच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या या चित्रपटामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले होते. ओटीटीवर या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, सुरेंद्र कोलीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. आत्महत्येची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात असली तरी पोलिसांकडून या घटनेचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. निठारी हत्याकांडामुळे तब्बल दोन दशकांपूर्वी देशाला हादरवून सोडणारे नाव असलेल्या सुरेंद्र कोलीच्या मृत्यूने या गाजलेल्या प्रकरणाचा आणखी एक धक्कादायक अध्याय समोर आला आहे.

