रणजित मस्के, गुन्हे वार्ताहर
सातारा : सातारा शहर परिसरात टोळीची दहशत निर्माण करून सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांकडून आर्थिक तसेच अन्य फायदे मिळविण्याच्या उद्देशाने संघटितपणे गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील टोळीप्रमुखासह तीन आरोपी आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सराईत व संघटितपणे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी मोक्का कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांमार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडे सादर केला होता.
शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०४/२०२६ अन्वये दाखल असलेल्या प्रकरणात प्रेम गणेश पवार (वय २२, रा. शुक्रवार पेठ, सातारा) हा टोळीप्रमुख, तर प्रेम आबासाहेब अडागळे (वय २१, रा. सिद्धिविनायक कॉलनी, शाहूपुरी), आनंद ऊर्फ अण्णा लक्ष्मण माने (वय २१, रा. जिव्हाळा कॉलनी, दिव्यनगरी, शाहूपुरी) आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. या आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, जबरदस्तीने पैसे हिसकावून घेणे, मारामारी, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघन, शिवीगाळ, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी देणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या टोळीने परिसरात दहशत निर्माण करून आर्थिक व अन्य फायद्यांसाठी संघटितपणे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने मोक्का कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी संबंधित गुन्ह्याची कागदपत्रे व मोक्का प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर गुन्ह्यात मोक्का कायद्यांतर्गत कलम वाढविण्यास परवानगी दिली. तसेच पुढील तपास सातारा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात कायदा हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या, संघटित गुन्हेगारी करणाऱ्या तसेच अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध आगामी काळातही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा सातारा पोलिसांनी दिला आहे. सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करून जिल्ह्यात निर्भय वातावरण निर्माण करण्यासाठी गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका बाबर तसेच पोलीस अंमलदारांनी केली.

